फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावरून वाद!

By admin | Published: November 7, 2016 03:07 AM2016-11-07T03:07:18+5:302016-11-07T03:07:18+5:30

वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्यांना डावलून केवळ परवाना असलेल्यांनाच मार्केटमध्ये जागा देण्याची भूमिका सद्यस्थितीला महापालिका अधिकारी राबवत आहेत.

Claim on rehabilitation of hawkers! | फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावरून वाद!

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावरून वाद!

Next

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्यांना डावलून केवळ परवाना असलेल्यांनाच मार्केटमध्ये जागा देण्याची भूमिका सद्यस्थितीला महापालिका अधिकारी राबवत आहेत. असाच प्रकार वाशीपाठोपाठ कोपरखैरणेतील फेरीवाला मार्केटमध्ये सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावरून येत्या काळात वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशीपाठोपाठ कोपरखैरणे सेक्टर ८ मधील फेरीवाला भूखंडावरील मार्केट येत्या दोन दिवसांत खुले होण्याच्या मार्गावर आहे. त्याची प्रक्रिया देखील विभाग कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. परंतु १९९८ ते ९९ दरम्यान ज्यांना परवाना वाटप झालेला आहे, अशांनाच त्याठिकाणी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गेली १५ ते २० वर्षे त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना या प्रक्रियेत डावलले जाणार आहे. याचा संताप त्याठिकाणच्या फेरीवाल्यांकडून व्यक्त होत आहे.
परिस्थितीअभावी घरखर्च चालवण्यासाठी अनेक जण भाजी, फळे अथवा मासळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मागील काही वर्षांत पालिकेने एकही फेरीवाला परवाना वाटप न केल्यामुळे भविष्यात तो मिळेल या आशेवर अनेक जण फेरीवाला भूखंडावर वर्षानुवर्षे एकाच जागी व्यवसाय करत आहेत. अशाच प्रकारे कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक फेरीवाले जागा अडवून बसले होते. पालिकेने त्याठिकाणी मार्केट उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांचा सर्व्हेही झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये हमखास जागा मिळेल असा विश्वास होता. प्रत्यक्षात मात्र महापालिकेकडून फेरीवाल्यांची निराशा झाली आहे.
अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना डावलून केवळ ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांनाच मार्केटमध्ये व्यवसायासाठी जागा देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. यामुळे मूळ फेरीवाला सुविधेपासून वंचित राहणार आहे. प्रत्यक्षात जे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत त्यांनाच परवाने मिळण्याची गरज आहे. मात्र महापालिकेने १९९८-९९ साली ज्यांना परवान्याचे वाटप केले आहे, त्यांना मार्केटमध्ये जागा देण्याचे धोरण पालिका अधिकारी राबवत आहेत. यावरून येत्या काळात फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
पालिकेने ज्यांना परवान्याचे वाटप दिले, त्यापैकी अनेकांनी कुटुंबामध्येच एकापेक्षा जास्त परवाने लाटल्याची देखील शक्यता आहे. यामुळे प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना परवाना देवून जागा वाटपात प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यापैकी काहींनी वॉक विथ कमिशनर दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेवून फेरीवाला परवान्याची मागणी देखील केलेली. यावेळी मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत योग्य प्रक्रिया राबवण्याचेही त्यांना सूचित केले होते.

Web Title: Claim on rehabilitation of hawkers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.