शासकीय कार्यालयांकडूनच स्वच्छता अभियानाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:33 AM2018-12-20T03:33:49+5:302018-12-20T03:34:20+5:30

आवारातच डेब्रिजचे साम्राज्य : महापालिकेसह इतर यंत्रणांची स्वच्छतेबाबत उदासीनता

Cleanliness campaign through government offices | शासकीय कार्यालयांकडूनच स्वच्छता अभियानाचे वाभाडे

शासकीय कार्यालयांकडूनच स्वच्छता अभियानाचे वाभाडे

Next

योगेश पिंगळे

नवी मुंबई : सध्या शहरात स्वच्छ शहर अभियानांतर्गत विविध कामे सुरू आहेत; परंतु या मोहिमेची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणांनाच या अभियानाचेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. महापालिका, सिडको, कोकण भवन व पोलीस ठाण्याच्या आवारातील डेब्रिज व कचरा पाहिल्यास या अभियानाचे वाभाडे निघाल्याचे दिसून येते.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण या उपक्र मात नवी मुंबई महापालिकेने २०१७ साली स्वच्छतेत देशात आठवा तर राज्यात पहिला क्र मांक पटकाविला होता, तर २०१८ साली झालेल्या याच उपक्रमात घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून नामांकन प्राप्त केले आहे. शहरात अभियान राबविताना महापालिका प्रशासनाला पालिका मुख्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयांच्या आवारातील स्वच्छतेचा विसर पडला आहे. महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर भंगार साहित्य, वापरात नसलेली आणि धुळीने माखलेली बंद वाहने, डेब्रिज, मुख्यालयावर रोषणाई करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदी साहित्य पडले आहे. तसेच पालिका विभाग कार्यालयांच्या आवारात फेरीवाल्यांचे जप्त केलेले साहित्य, हातगाड्या, गॅस सिलिंडर, डेब्रिज, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, नामफलक, जप्त केले बॅनर, कचऱ्याचे ढीग, प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल आदी भंगार साहित्य गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहे.
कोकण भवन इमारतीच्या परिसरात डेब्रिज, अपघातग्रस्त आणि भंगार वाहने, झाकणे नसलेली ड्रेनेजची गटारे, उघड्यावरील सांडपाणी, उघड्यावर टाकलेला कचरा आदी साहित्य पडलेले आहे. सिडको मुख्यालयाच्या वाहने पार्किंगच्या आवारात डेब्रिज आणि कचºयाचे साम्राज्य पसरले असून गेल्या अनेक वर्षांपासून भंगार वाहने उभी करण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यांच्या आवारात तसेच रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त आणि जप्त केलेली वाहने मोठ्या प्रमाणावर असून यामुळे परिसराला बकाल रूप प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण हा केंद्र शासनाचा उपक्रम असून महापालिकासह सर्वच शासकीय यंत्रणांवर याची जबाबदारी आहे. परंतू या कार्यालयांच्या आवारातच कचरा आणि भंगार साहित्याचे ढीग साचल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Cleanliness campaign through government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.