न्यायव्यवस्थेवर समाजाचा पूर्ण विश्वास आहे - अॅड. उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:50 AM2018-02-14T03:50:09+5:302018-02-14T03:50:16+5:30
समाजाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणत्याही जातीधर्माचा न्यायालयाच्या निकालावर कधीच परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई : समाजाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणत्याही जातीधर्माचा न्यायालयाच्या निकालावर कधीच परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. वाशीतील श्री सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सव सोहळ्यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत अॅड. निकम यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
कामातील सत्यता, संयम व आत्मविश्वास यामुळेच कसाबसारख्या दहशतवाद्याला शिक्षा मिळाल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले. नेहमी सत्याच्या बाजूने लढत आलो असून, यापुढेही सत्याच्या बाजूनेच लढणार, असा ठाम विश्वास अॅड. निकम यांनी वाशीत व्यक्त केला. या मुलाखतीतंर्गत त्यांचा गाजलेल्या खटल्यांचा व वैयक्तिक जीवनप्रवास उलगडण्यात आला. कुलभूषण जाधव मायदेशी परतणार का, असा प्रश्न विचारला असता पाकिस्तानची राजनीती मोठी धोकादायक असल्याचे वक्तव्य करत पाकिस्तान सरकार दुटप्पी नीती वापरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्य नेटाने मांडले म्हणूनच कसाबच्या खटल्यात पाकिस्तान कशाप्रकारे दोषी आहे, हेही जगासमोर मांडता आले, असे ते म्हणाले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात देशाच्या विरोधात वाईट कृत्य करणाºयांना शिक्षा मिळाली. हे स्फोट दाऊद आणि त्याच्या इतर साथीदारांनी घडवून आणल्याचे तपासात समोर आले होते. या खटल्यासाठीच आपण सरकारी वकील म्हणून प्रथम मुंबईत आलो आणि हा खटला चालवला. या प्रकरणात सिनेअभिनेत्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. माणूस कितीही मोठा असो, तो नेता, अभिनेता असो कायद्यासमोर सगळेच सारखे आहेत. हा आपली न्यायव्यवस्था सक्षम असल्याचा पुरावा असल्याचे निकम यांनी सांगितले.