योगेश पिंगळेनवी मुंबई : शहरात नवनवीन खेळाडू घडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सीबीडी, जुईनगर, वाशी भागात कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरक्रीडा संकुल उभारले आहे. परंतु सीबीडीमधील आंतरक्रीडा संकुलांचा वापर होत नसून मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या इमारतीमध्ये मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून साहित्याची तोडफोड झाली आहे.
शहरातील खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच नवनवीन खेळाडू घडावेत यासाठी महापालिकेने शहरातील मैदानांमध्ये आंतरक्रीडा संकुल उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सीबीडी, वाशी आणि जुईनगर येथे आंतरक्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. सीबीडी आणि जंगर येथे उभारण्यात आलेल्या इमारतींचे योग्य नियोजन न केल्याने वापर होऊ शकला नाही. वाशी येथील आंतरक्रीडा संकुल वापराविना बंदच आहेत. सीबीडी सेक्टर ८ बी येथील वीर जवान क्रीडांगणामध्ये २०१८ साली उभारण्यात आलेले आंतरक्रीडा संकुल ओस पडले असून सदर इमारत गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे. इमारतीचे गेट, विद्युत केबल, बॉक्स आदी साहित्याची मोडतोड झाली असून इमारतीमध्ये आणि आवारात मद्याच्या बाटल्या, अमली पदार्थ ओढून त्याचे कागद व इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर पडलेले आहे. इमारतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चूल बनविण्यात आली असून त्या ठिकाणी पार्ट्यादेखील केल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सामान्य नागरिकांना या परिसरात जाण्यास भीती वाटू लागली आहे.
कोट्यवधींचा खर्च व्यर्थखेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून महापालिकेने आंतरक्रीडा संकुले ज्या परिसरात उभारले आहे तेथील किती खेळाडूंना या क्रीडा संकुलाचा वापर करता येईल याचा विचार केला नाही. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या आंतरक्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडेदेखील महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.