नवी मुंबई : पेट्रोलपंपावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा आढळून आल्या आहेत. ५०० व १००० च्या नोटा बंद झाल्याची संधी साधत त्यांच्याकडून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात होता.मुर्गन चेटी (६४), बरकतअली शेख (३१) व अनिल धारोड (५२) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांच्या ५०० च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सीबीडी येथील पेट्रोलपंपावर ते बनावट नोटा वापरत असताना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पथकाने त्यांना अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केली. त्यानंतर प्रत्येकाकडून स्वत:कडील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याकरिता पेट्रोलपंपावर देखील अनेकांनी गर्दी केलेली. याचीच संधी साधत तिघे जण सीबीडी येथील पेट्रोलपंपावर बनावट नोटा वापरात आणण्याच्या प्रयत्नात होते; परंतु त्यांच्याकडील नोटा बनावट असल्याचे निदर्शनास येताच पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अंगझडतीमध्ये चेटी याच्याकडे १८१, शेख याच्याकडे १६९ तर धारोड याच्याकडे १५० अशा एकूण ५०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांनी या नोटा कुठून आणल्या याचा शोध घेतला जात असल्याचे सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त
By admin | Published: November 16, 2016 4:43 AM