नेरूळमधील कुंटणखान्यावर गुन्हे शाखेचा छापा; मसाजच्या नावाखाली चालायची देहविक्री
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 5, 2024 05:04 PM2024-04-05T17:04:35+5:302024-04-05T17:05:25+5:30
नेरुळमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली.
सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : नेरुळमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याठिकाणी ठेवलेल्या महिलांची सुटका करण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील २१ ते २५ वर्षीय महिला, मुलींकडून देहविक्री करून घेतली जात होती.
नेरुळ सेक्टर १३ येथील पायराइट्स स्पा या मसाज पार्लरमध्ये देहविक्री चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने गुरुवारी संध्याकाळी त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवले होते. या ग्राहकामार्फत तिथल्या अवैध धंद्याची खात्री होताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली कुंटणखाना चालत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी मॅनेजर दीपक शर्मा (२२) व सफाई कामगार अरुण सरवटा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदर मसाज पार्लरचा मालक कोण हे गुलदस्त्यात असून पोलिस त्याच्यावरही कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या २१ ते २५ वर्षीय महिला, मुलींना मसाजच्या कामाच्या बहाण्याने नोकरीवर ठेवून त्यांच्याकडून देहविक्री देखील करून घेतली जात होती. यासाठी ग्राहकाकडून ५ हजार रुपये आकारून संबंधित महिला, मुलीला दोन हजार रुपये दिले जायचे.
मागील अनेक दिवसांपासून त्याठिकाणी हा कुंटणखाना चालवला जात होता. यापूर्वी देखील नेरुळ परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर कारवाया झालेल्या आहेत. परिसरातील काही लॉज हे केवळ वेश्याव्यवसायाला चालवले जात आहेत. त्यानंतरही परिसरातले अवैध धंदे बंद होत नसल्याने पोलिसांचे त्यांना छुपे पाठबळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेमार्फत नेरुळ परिसरात कारवाई केल्या जात असल्याने, नेरुळ पोलिसांच्या भूमिकेवर देखील आयुक्तालयात नाराजी व्यक्त होत आहे.