घणसोलीमध्ये खारफुटीत डेब्रिज, स्वच्छता अभियानाचा उडतोय फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:08 AM2018-02-13T03:08:36+5:302018-02-13T03:09:28+5:30
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाही घणसोलीत मात्र अभियानाचा अभाव दिसून येत आहे. रस्त्यांलगत बांधकामाच्या मातीचे ढिगारे साचले असून खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकार-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नवी मुंबई : शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाही घणसोलीत मात्र अभियानाचा अभाव दिसून येत आहे. रस्त्यांलगत बांधकामाच्या मातीचे ढिगारे साचले असून खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकार-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
स्वच्छतेमध्ये शहराला देशात अव्वल सिद्ध करण्यासाठी पालिकेकडून सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. रहिवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून त्यांना कचरा वर्गीकरणाचेही महत्त्व पटवून दिले जात आहे. त्याकरिता रहिवाशी सोसायट्यांना प्रोत्साहनपर सत्कार केले जात आहेत. मात्र, जनतेमध्ये बदल घडविला जात असताना, अधिकाºयांना मात्र त्यांच्या कर्तव्याचा विसर पडत आहे का? असाही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घणसोलीमध्ये प्रत्येक सोसायट्यांमध्ये स्वच्छता अभियानांतर्गत उपक्रम राबविले जात आहेत.
या दरम्यान, परिसरातील रस्ते मात्र अधिकाºयांकडून दुर्लक्षित होत आहेत. यामुळे घणसोलीतील पामबीच मार्गावर मोठ्या प्रमाणात डेब्रिजचे ढीग साचले आहेत. नोडच्या प्रवेशद्वारावरच ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे घनसोलीत स्वच्छता अभियान राबविले जात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रतिदिन अज्ञात व्यक्तींकडून टेंपोमध्ये डेब्रिज आणून त्या ठिकाणी टाकले जात आहे. खारफुटीमध्ये कोणत्या प्रकारचे अतिक्रमण अथवा घाण टाकली जाऊ नये, अशा प्रकारची सूचना फलकदेखील लागलेले आहेत. अशाच फलकांच्या खाली डेब्रिजचे ढीग दिसत आहेत. राजरोसपणे हा प्रकार सुरू असतानाही डेब्रिजमाफियांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
दोन दिवसांपूर्वी घरोंदा येथे सुरू असलेल्या उद्यानाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणीदेखील रात्रीच्या वेळी डम्पर भरून डेब्रिज टाकण्यात आले होते. उद्यानातील मातीवर पडलेले डेब्रिज सकाळी काही व्यक्तींच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी ठेकेदाराला सांगून ते डेब्रिज हटविले. त्यामुळे घणसोलीत मोठ्या प्रमाणात डेब्रिज माफियांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार केंद्राच्या निधीतून नाल्यालगत हरित पट्टा विकसित करण्याच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
भरावामध्ये मातीच्या खाली डेब्रिज टाकल्याचे पाहायला मिळत असल्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज येते, कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे. त्याशिवाय नव्याने विकसित होत असलेल्या सेक्टरमध्येदेखील मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत मातीचे ढिगारे रचण्यात आले आहेत. या मातीचे कण हवेसोबत संपूर्ण परिसरात धूळ पसरत आहेत.