वैभव गायकरपनवेल : ‘ओखी’ वादळ सर्वांनाच धडकी भरवणारे होते. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक संकटाने सर्वांचीच धावपळ उडाली. शासकीय यंत्रणेने देखील या संकटाशी दोन हात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. अखेर हे वादळ गुजरातकडे सरकल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या वादळामुळे सकारात्मक बाब पुढे आली आहे. ओखी वादळाच्या आगमनाने नवी मुंबईमधील वायुप्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस या केंद्र शासनाच्या संलग्न असलेल्या संस्थेने केलेल्या हवेतील मोजमापाच्या सर्व्हेनुसार ही माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई, पनवेल दोन्हीही पालिका क्षेत्र याठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीत स्थिती आणखीनच बिकट आहे. या प्रदूषणाविरोधात अनेक रहिवासी संघटना लढा देत आहेत. खारघर आणि तळोजा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन वी वॉन्ट क्लीन एअर (आम्हाला स्वच्छ हवा हवी आहे) ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन महिन्यांपासून प्रत्येक दिवसाचे हवेतील प्रदूषण याबाबत माहिती घेतली जात आहे. केंद्र सरकारच्याच नियंत्रणात असलेली सफर इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिस ही संस्था संपूर्ण देशभरात प्रदूषणाच्या पातळीबाबत मोजमाप करून, ती माहिती सार्वजनिक करते. इंडियन एअर क्वालिटी सर्व्हिस या अॅपवर आपल्याला ही माहिती मिळते. ‘ओखी’ वादळापूर्वी म्हणजेच ४ डिसेंबर आधी नवी मुंबईमधील हवेतील प्रदूषणाची पातळी ही खूप वाईट अवस्थेत होती.
या संस्थेने केलेल्या मोजमापानुसार (एअर क्वालिटी इंडेक्स) हे ३१० एवढे होते, तर ५ डिसेंबरला नवी मुंबईत ‘ओखी’मुळे वादळ वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळानंतर दुसºया दिवशी ६ डिसेंबरला प्रदूषणाचा आढावा घेतला असता प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. या संस्थेच्या माहितीनुसार एअर क्वालिटी इंडेक्सवर बुधवारी १९८ एवढी नोंदवली गेली. त्यामुळे आजची प्रदूषणाची पातळी ही येथील रहिवाशांच्या दृष्टीने समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
खारघरमधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी यासंदर्भात रोजच्या हवेतील पातळीची माहिती घेतली. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे संपूर्ण नवी मुंबईमधील प्रदूषणाची प्रत्येक दिवसाची माहिती आहे. मात्र, ‘ओखी’नंतर प्रथमच नवी मुंबईत अशा प्रकारची शुद्ध हवा वाहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे वादळात मोठ्या प्रमाणात हवेचा दाब निर्माण होत असतो त्यामुळेच नवी मुंबईत हा फरक जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.