महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा- चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:25 AM2020-07-19T01:25:55+5:302020-07-19T01:26:12+5:30
कोन येथील पीडितेची घेतली भेट
नवीन पनवेल : इंडिया बुल्स कोन येथील विलगीकरण कक्षात महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. या विलगीकरण कक्षाला शनिवारी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महापौर कविता चोतमोल यांनी भेट दिली. या वेळी महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी वाघ यांनी केली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर पीडितेची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
पनवेल-कोन येथील विलगीकरण कक्षात एका ४० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचे उघड झाल्याने, येथे उपचारासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे कोरोनाग्रस्त महिलेने उपचारासाठी जायचे नाही का? की महिलांनी घरातल्या घरातच मरायचे, असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक व्हायला हवी, तसेच आरोपीसह सुरक्षारक्षक आणि प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.