नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित केले. त्यापैकी अनेक प्रकल्प पूर्णही झाले. तर काही प्रकल्प अद्यापि कागदावरच आहेत. कोणत्याही अंमलबजावणीअभावी दीर्घकाळ कागदावर राहिलेले हे प्रकल्प कायमस्वरूपी गुंडाळण्याची नामुश्की आता सिडकोवर ओढावली आहे. ऐरोली येथील आंतरराष्ट्रीय दूतावासाचा प्रकल्प रद्द केल्यानंतर आता खारघर येथील नियोजित बॉलिवूड हिलचा प्रकल्पही गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत आहे. सिडकोच्या माध्यमातून शहरात निर्माण करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, प्रशस्त रस्ते, दर्जेदार रेल्वेस्थानके, सुनियोजित नागरी वसाहती, पामबिच खारघर येथील गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क तसेच प्रगतिपथावर असलेला मेट्रो प्रकल्प आदीमुळे शहराचा नावलौकिक वाढण्यास मदत झाली आहे. आता यात आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडत असल्याने हे शहर खºया अर्थाने जागतिक दर्जाचे शहर होणार आहे. शहराचा हा संभाव्य दर्जा लक्षात घेऊन सिडकोने विविध आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प प्रस्तावित केले होते. यात रेल्वेस्थानकांवर स्मार्ट पार्किंग, आंतरराज्य बस टर्मिनल, नेचर पार्क, सायन्स सिटी, नवी मुंबई एसईझेड तसेच खारघर येथे कार्पोरेट पार्क, ऐरोलीतील आंतरराष्ट्रीय दूतावास व खारघर येथे बॉलिवूड हिल आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही प्राथमिक स्तरावर आहेत. दूतावासाचा प्रकल्प अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रद्द करण्यात आला आहे. तर या नियोजित जागेवर थिम सिटी उभारण्याचा निर्णय आता सिडकोने घेतला आहे. त्याचप्रमाणे खारघर येथील पांडव कड्याच्या वर डोंगरमाथ्यावर २५0 एकर जागेवर खारघर हिल प्लॅट्यू अर्थात बॉलिवूड हिलचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहेत. त्याचा फटका बॉलिवूड हिलला बसला आहे. त्यामुळे हा प्रकल्पसुद्धा कायमस्वरूपी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नियोजित प्रकल्प गुंडाळण्याची नामुश्की : दूतावासापाठोपाठ खारघरचे बॉलिवूड हिलही बारगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:38 AM