नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरात उघड्यावर गॅस सिलिंडरचे वितरण केंद्र चालवले जात आहे. त्या ठिकाणी सिलिंडरच्या टाक्यांची आदळआपट, तसेच निष्काळजीपणे हाताळणी होत असल्याने भीषण दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतरही पालिका अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.तुर्भे स्टोअर परिसरातील रस्त्यांवर गॅस सिलिंडर हाताळणी होत आहे. त्या ठिकाणच्या मच्छी मार्केटलगतच्या जागेत बेकायदेशीरपणे गॅस कंपन्यांनी त्यांची उघड्यावर कार्यालयेच थाटली आहेत. मोठ्या वाहनांतून गॅस सिलिंडरच्या आणलेल्या टाक्या त्या ठिकाणी उतरवून, संबंधित ग्राहकांना त्याचे वितरण केले जाते. गेले अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. सिलिंडर टाक्यांची आदळआपट होत असल्याने पदपथांचे तसेच गटारांच्या झाकणांचेही नुकसान होत आहे, संबंधित गॅस वितरकावर कारवाईची मागणी शेकापचे जिल्हा कार्यालय चिटणीस गोविंद साळुंखे यांनी केली आहे; परंतु उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे पालिका अधिकाऱ्यांसह पोलीस ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केला़
गॅस सिलिंडरचे उघड्यावर वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:35 AM