नवी मुंबईत दोन लाख रामप्रसाद लाडूंचे वाटप
By योगेश पिंगळे | Published: January 21, 2024 07:08 PM2024-01-21T19:08:43+5:302024-01-21T19:09:04+5:30
रामपताका, दीपोत्सव दिवे अभियान.
नवी मुंबई : स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान तर्फे अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी रामभक्तांना प्रभू रामाच्या जयघोषामध्ये ५० हजार किलो म्हणजेच सुमारे दोन लाख लाडूंचे राम प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. तसेच रामपताका आणि दीपोत्सवासाठी दिव्यांचे वाटप करण्यात आले.
कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाचा मैदान परिसर श्रीराम गीतांनी भक्तिमय बनला होता. सर्वत्र रामपताका डौलाने फडकत होत्या. आयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्साह आणि आनंद प्रत्येक रामभक्ताच्या चेहऱ्यावर जाणवत होता. माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव नाईक आणि संदीप नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रसादाचे लाडू वळण्याचे सेवाकार्य यावेळी केले. नवी मुंबईतील विविध मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळांमध्ये रामप्रसाद, राम पताका आणि दीपोत्सवासाठी दिवे वितरित करण्यासाठी संबंधित विभागातील रामभक्तांकडे आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. केवळ भारतातच नाही तर जगभरात श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा होत आहे. रामभक्तांनी घरोघरी, सर्वत्र रामपताका लावून आणि दिवे प्रज्वलित करून प्रतिष्ठापना उत्सव साजरा करण्याचे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले.
प्रभू रामचंद्रांची महारांगोळी...
श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान तर्फे कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या पटांगणावर श्री रामाची ३६०० चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे. प्रख्यात कलाकार श्रीहरी पवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बारा तासांच्या परिश्रमानंतर ही श्रीरामाची मनमोहक रांगोळी साकारली आहे. या रांगोळीसाठी तब्बल ७५० किलो विविध रंगांच्या रांगोळीचा वापर करण्यात आलेला आहे. सोमवारी ही महारांगोळी सर्वाना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.