लीज डीडचा कालावधी केवळ ३९ वर्षांनी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:48 PM2019-03-06T23:48:27+5:302019-03-06T23:48:39+5:30

फ्रीहोल्डची मागणी करणाऱ्या नवी मुंबईकरांना ९९ वर्षांपर्यंत लीज डीड वाढविण्याची घोषणा सिडकोने केली;

Duration of lease deed will increase only in 39 years! | लीज डीडचा कालावधी केवळ ३९ वर्षांनी वाढणार!

लीज डीडचा कालावधी केवळ ३९ वर्षांनी वाढणार!

Next

नवी मुंबई : फ्रीहोल्डची मागणी करणाऱ्या नवी मुंबईकरांना ९९ वर्षांपर्यंत लीज डीड वाढविण्याची घोषणा सिडकोने केली; परंतु प्रत्यक्षात लीज डीडचा कालावधी केवळ ३९ वर्षे इतकाच वाढविला जाणार आहे. त्यामुळे सिडकोने पुन्हा फसवणूक केल्याचा सूर नवी मुंबईकरांत उमटला आहे.
नवी मुंबईतील जमिनीची संपूर्ण मालकी सिडकोची आहे. सिडकोने विविध प्रयोजनासाठी या जमिनी ६0 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या आहेत. त्यामुळे या जमिनी फ्रीहोल्ड कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हा विषय दीर्घकाळ लावून धरला. परंतु सिडकोच्या मालकीच्या सर्व जमिनी भोगवटादार वर्ग-२ मध्ये मोडत असल्याने शासकीय नियमानुसार त्या फ्री होल्ड करता येत नाहीत. त्यामुळे फ्री होल्डऐवजी भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींचे रूपांतरण लीज होल्डमध्ये करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. तशा आशयाचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पारित करून तो राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला. या प्रस्तावाला राज्य सरकारने २0 डिसेंबर २0१८ रोजी मंजुरी दिली. त्यानुसार लीजचा कालावधी संपल्यास नियमानुसार अतिरिक्त शुल्क आकारून लीज डीडचा कालावधी ९९ वर्षांपर्यंत वाढविला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सरसकट ९९ वर्षांचा कालावधी मिळणार नसून पूर्वीची भाडेपट्ट्याची ६0 वर्षे गृहीत धरून केवळ ३९ वर्षांचा लीज डीड वाढवून दिला जाणार असल्याचे सिडकोने जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे हा लीज डीडचा कालावधी वाढविताना त्या त्या वेळच्या धोरणानुसार लीज प्रीमियमसुद्धा आकारले जाणार आहे. परंतु कोणत्याही मालमत्तेची विक्री करताना यापुढे सिडकोची परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र, अतिरिक्त चटईनिर्देशांकासाठी सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
१२.५ टक्के आणि २२.५ टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांनासुद्धा हा नियम लागू असणार आहे. लीज डीड वाढवून घेण्यासाठी सध्या दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी भरावे लागणारे रूपांतरण अधिमूल्यही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार हे अधिमूल्य भूखंडांच्या क्षेत्रफळानुसार ५ ते ३0 टक्के इतके आहे.
एकूणच लीज डीडच्या नावाखाली सिडकोने नवी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नवी मुंबईकरांतून व्यक्त होत आहेत.

Web Title: Duration of lease deed will increase only in 39 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.