वैभव गायकर / पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील बहुतांशी ई-लर्निंग संच बंद असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी उघडकीस आणली होती. त्यानुसार पंचायत समितीने १०४ संच जमा केले होते. यात सुधारित अभ्यासक्रम अपडेट करून ते पुन्हा शाळेकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे खऱ्या अर्थाने धडे घेता येणार आहेत. ई-लर्निंगमुळे शिक्षक आणि शिक्षण विभागासमोरील अडचण सुध्दा बऱ्याच अंशी दूर होण्याची शक्यता आहे. पंचायत समिती सेस फंडातून २०१५-१६ मध्ये सत्ताधाऱ्यांनी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून ई-लर्निंग संच खरेदी करण्यात आले होते. तालुक्यात एकूण २६३ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यापैकी १७१ शाळांनाच संच देण्यात आले. त्यामध्येही चौथीपर्यंत शाळांची संख्या जास्त आहे. असे असतानाही त्यांच्याकरिता फक्त ३४ संचांची निविदा मागविली आणि सातवीपर्यंत शाळांची संख्या तुलनेने कमी असताना त्यासाठी ९० संच मागविले होते. तत्कालीन गटविकास अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी शिक्षण विभागाला विचारात न घेता हे संच खरेदी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तब्बल १०४ ई-लर्निंग संच वापराविना पडून असल्याचे पंचायत समितीचे सदस्य नीलेश पाटील यांनी उघडकीस आणले होते. मासिक सभेत याबाबत त्यांनी आवाजही उठवला होता. परंतु फक्त दोनच संच बंद असल्याचा दावा यावेळी पंचायत समितीकड़ून करण्यात आला होता. शिक्षण विभागाकडून मिळालेले पत्र सादर करताच सुधारित अभ्यासक्र माकरिता १०४ डोंगल पंचायत समिती कार्यालयाकडून जमा करण्यात आल्याचा उल्लेख होता. गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या सहीने ही माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी त्याचबरोबर प्रशासन निरुत्तर झाले. दिवाळीआधी पाटील यांनी याप्रकरणी निषेध नोंदवून गटविकास अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणीही केली होती. आता ई-लर्निंगसाठी अपडेट करण्यात आलेले संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात सुधारित अभ्यासक्र माची माहिती आहे. हे डोंगलच्या सहाय्याने दिवाळीच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे घेता येणार आहेत.
दुसऱ्या सत्रात ई-लर्निंगचे धडे
By admin | Published: November 15, 2016 4:49 AM