हॉटेलसाठी हवेत आठ हजार कामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:47 PM2020-10-01T23:47:01+5:302020-10-01T23:47:11+5:30
वीजबिल, करामध्ये हवी सूट : हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी
अनिकेत घमंडी ।
डोंबिवली : राज्य सरकारने ५ आॅक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आता हॉटेल व्यावसायिकांना कुशल कामगारांची कमतरता भसणार आहे. डोंबिवलीतील २०० विविध हॉटेल, स्नॅक्स बारमध्ये सुमारे आठ हजार कामगार लागतात. परंतु, ते आता लगेच आणायचे कुठून? या विवंचनेत व्यावसायिक आहेत, याकडे डोंबिवलीतील हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हॉटेल पूर्णत: बंद होती. पुढे ती फक्त पार्सल देण्यापुरतीच खुली झाली. यामुळे आचारी व बहुतांश कर्मचारी एप्रिलमध्येच गावी गेले. परिणामी, चांगले आचारी व अन्य कर्मचारी मिळणे कठीण आहे. अजूनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कामगार यायला तयार नाहीत. त्यात जे कामगार आले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे.’ ‘बहुतांश हॉटेलच्या जागा भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे जागाभाडे तसेच वाणिज्य दराने वीजबिल, पाणीबिल व मालमत्ताकर कसा भरावा, या चिंतेने व्यावसायिक त्रस्त आहेत. अन्य घटकांप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांनी पुन्हा उभारी घेण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे. सहा महिन्यांचे जागाभाडे, मालमत्ताकर, वीजबिल यामध्ये सूट द्यावी. एखाद्या कामगाराला बाधा झाल्यास त्याला पालिका रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळावेत. तसेच पुन्हा पूर्ण हॉटेल बंद करण्यासंदर्भात निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी त्यांनी केली.
नियम पाळताना करावी लागणार कसरत
हॉटेल पुन्हा सुरू करताना नियम पाळावे लागणार आहेत. ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, कमी टेबल ठेवणे, हे करावे लागणार आहे.
अनेक हॉटेलमध्ये मुबलक जागाही नाही. तसेच ग्राहक पूर्वीसारखे येतील का, हा एक प्रश्न आहे. आरोग्याचा विचार करता सर्व कर्मचाºयांना एकावेळी पूर्ण क्षमतेने कामावर ठेवता येणार नाही.
तसेच त्यांचे निवास, भोजन, कपडे यासाठीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांच्या वेतनासाठीही मोठी तजवीज करावी
लागणार आहे, असे शेट्टी म्हणाले.