पतसंस्थेकडून वीज ग्राहकांची अडवणूक
By admin | Published: November 16, 2016 04:48 AM2016-11-16T04:48:00+5:302016-11-16T04:48:00+5:30
वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची पतसंस्थेकडून अडवणूक करण्यात येत असून बिलाच्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित १०० - १२५ रु पये परत
पनवेल : वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची पतसंस्थेकडून अडवणूक करण्यात येत असून बिलाच्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित १०० - १२५ रु पये परत करण्यास नकार देत आहेत. जास्त कमिशन मिळावे म्हणून पूर्ण पैसे जमा करण्याची सक्ती ग्राहकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नवीन पनवेलमधील एका सहकारी पतपेढीवर कारवाईची मागणी केली आहे.
वीजबिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारने जुन्या नोटा वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर १५ ए मध्ये असलेल्या एका सहकारी पतपेढीत वीजबिल भरण्यासाठी जाणाऱ्यांना सुटे पैसे परत न देता बिलाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्याची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. एका ग्राहकाचे वीजबिल २८५० इतके होते, त्याने हजाराच्या ३ नोटा दिल्यावर त्याला उर्वरित पैसे परत करण्यास नकार देण्यात आला. या वेळी अन्य एका ग्राहकाने १०० च्या व १० ते २० रुपयांच्या नोटा देऊन बिल भरल्याने सुट्या पैशांचा अभाव असेही म्हणता येणार नाही. याबाबत विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, वरिष्ठांकडून तसे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पतसंस्थांना भरणा झालेल्या रकमेवर कमिशन मिळते. ग्राहकांकडून जास्त पैसे असल्यास कमीशनही जास्त मिळत असल्याने अडवणूक करण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.