तळोजा : आशिया खंडातील सर्वात मोठा लोखंड बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंबोलीतील स्टील मार्केटला अतिक्रमणाचा विळख पडला आहे. विशेष म्हणजे अनेकांनी अतिक्रमण करून सामाजिक वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर कब्जा केला आहे. या प्रकाराकडे सिडको व बाजार व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने वाहतूकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.सिडकोने या लोखंड व पोलाद बाजाराच्या सामायिक वापरासाठी आरक्षित केलेल्या भूखंडांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अलिकडेच सुरू केली आहे. या परिसरात अशा प्रकारे सामायिक वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची संख्या जवळपास दीड हजार इतकी आहे. त्यापैकी आतापर्यंत सिडकोने लोखंड व पोलाद बाजार समितीकडे केवळ अकरा भूखंड हस्तांतरण केल्याचे समजते. उर्वरित भूखंडांवर अतिक्रमण असल्याने ही प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे. असे असले तरी हे भूखंड अतिक्रमणमुक्त करून समितीच्या सुर्पर्द करण्याची सिडकोची योजना आहे. परंतु यापूर्वी हस्तांतरीत झालेल्या भूखंडांवरही अतिक्रमण झाले आहे.एक हजार नऊशे साठ गोदामे असलेल्या या लांखड बाजारातील चालक, कार्यालयीन कर्मचारी व व्यापाऱ्यांच्या सामायिक वापरासाठी हे भूखंड आरक्षित केलेले आहेत. चालकांसाठी विविध ठिकाणी तीन स्वच्छतागृहांसाठी जागा देण्यात आली आहे. तसेच विरंगुळा केंद्र आणि उद्यानासाठी या परिसरात एकूण ४१ भूखंड राखून ठेवलेले आहेत. मात्र यातील बहुतांशी भूखंडांवर गॅरेज मालकांनी ताबा मिळविला आहे. लोखंड बाजाराचा आवाका पाहता अवघ्या सोळा ठिकाणी वाहन तळाची सुविधा आहे. वाहनतळासाठी राखीव असलेल्या भूखंडांवर व्यापाऱ्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे बाजार आवारातील वाहतूक नियमनाचे तीन तेरा वाजले आहेत. विशेष म्हणजे लोखंड बाजारातील वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी ९ मनोरे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र सिडकोच्या उदासीन धोरणामुळे हा प्रस्तावही रखडल्याचे दिसून येते. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. (वार्ताहर
कळंबोलीत स्टील मार्केटला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Published: November 06, 2016 4:05 AM