नियोजित मार्केटच्या भूखंडांवर अतिक्रमण? सानपाडा-पामबीच येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:38 AM2019-01-06T04:38:51+5:302019-01-06T04:39:03+5:30
सानपाडा-पामबीच येथील प्रकार
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर-१४ येथील मार्केटच्या नियोजित भूखंडावर मार्केट उभारून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मार्केट असोसिएशनच्या सदस्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत; परंतु महापालिकेकडून मार्केट उभारणीच्या कामात चालढकल होत असल्याने या भूखंडावर अतिक्रमण होण्याची भीती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मार्केटसाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर २९२ व्यावसायिक व्यवसाय करतात; परंतु २००३-०४ मध्ये सिडकोने या जागेला कुंपण लावले, त्यामुळे येथील व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले, त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मार्केट असोसिएशनची स्थापना करून न्याय मागण्यासाठी संघर्ष सुरू केला. दरम्यानच्या काळात मार्केटसाठी असलेला हा भूखंड सिडकोने महापालिकेकडे वर्ग केला. या भूखंडावर उभारण्यात येणाºया मार्केटमध्ये गाळे वाटपात आमच्या सदस्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी असोसिएशनने लावून धरली. न्यायालयाने सुद्धा असोसिएशनची मागणी ग्राह्य धरत तसे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्य सचिवांनीसुद्धा या संदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. मात्र, महापालिकेकडून जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव आहिरे यांनी केला आहे. या संदर्भात न्यायालयात खटला सुरू होता, त्यामुळे महापालिकेच्या फेरीवाला सर्व्हेक्षणात असोसिएशनचे सभासद सहभाग घेऊ शकले नव्हते. आता न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्यामुळे महापालिकेने आमच्या असोसिएशनच्या सदस्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून नियोजित मार्केटमध्ये त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहिरे यांनी केली आहे.
या प्रक्रियेत महापालिकेकडून विलंब होत असल्याने नियोजित मार्केटबाबत राजकारण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच काही राजकीय पुढाºयांनी या भूखंडाचे भूमिपूजन करून त्यावर फलक लावले होते. हा न्यायालयाचा अपमान आहे, त्यामुळे महापालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणीही आहिरे यांनी केली आहे.