- नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटजवळ सिडकोने शाळेसाठी इमारत बांधली आहे. परंतु २० वर्ष या इमारतीचा वापर होत नसल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी तिथे अतिक्रमण केले आहे. ३१ आॅक्टोंबरला इमारतीला आग लावण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या दुर्घटनेनंतरही सिडको व महापालिकेने ही इमारत ताब्यात घेण्यासाठी काहीही हालचाली होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व महापालिकेने सामाजीक वापरासाठी शहरात अनेक इमारती बांधल्या आहेत. पण त्यामधील काही इमारतींचा प्रत्यक्षात वापरच होत नाही. अनेक इमारती नक्की कोणाच्या मालकिच्या आहेत याविषयी माहीतीच नाही. अशा इमारतींमध्ये एपीएमसी परिसरातील शाहेच्या वास्तूचाही समावेश आहे. मुळ विस्तारीत भाजी मार्केटच्या मध्यभागी सिडकोने ही इमारत बांधली आहे. काही दिवस त्यामध्ये शाळा भरविली जात होती. पण जवळपास २० वर्षापासून ती बंद अवस्थेमध्ये आहे. बाजारसमिती प्रशासनाने इमारत ताब्यात देण्याच मागणी सिडकोकडे केली होती. पण सिडकोने त्या प्रस्तावाला केराची टोपली दाखविली. बंद असलेल्या इमारतीचा वापर काही वर्षांपासून अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी सुरू केला आहे. य इमारतीचे गोडावून बनविले आहे. गुटखा, दारू व इतर वस्तूंचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी तिथे पोटभाडेकरू ठेवून भाडेवसुलीही सुरू केली. भाजी व फळ मार्केटमधील पॅकिंगसाठी आवश्यक खोक्यांचे गोडावून बनविण्यात आले आहे. या जागेचा वापर कोणी करायचा यावरून अवैध व्यवसाय करणारे व गर्दुल्यांमध्ये वाद होवू लागला होता. या वादामधून सोमवारी रात्री मद्यपी व गर्दुल्यांनी इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत आग विझविली नसती तर कदाचीत दोन्ही भाजी मार्केटला आग लागली असती अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजी मार्केटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. वास्तवीक होलसेल मार्केटमध्ये असलेल्या या जागेची किंमती करोडो रूपये आहे. पण या मालमत्तेकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. वास्तवीक ही इमारती महापालिकेच्या ताब्यात देणे आवश्यक होते. महापालिकेनेही इमारतीचे हस्तांतर करून घेणे आवश्यक होते. पण अद्याप कोणीही या इमारतीकडे लक्ष दिले नाही. बेवारस इमारतीचा ताबा अवैध व्यवसाय करणारांनी सुरू केला आहे. या इमारतीचा वापर करून गुटखा व अवैध दारूचा साठा करण्यासाठी केला जात आहे. नुकत्याच लागलेल्या आगीनंतरही सिडको व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीचा ताबा घेतलेला नाही. यामुळे व्यापाऱ्यांनीही तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वास्तूचा योग्य वापर करावा किंवा ती पाडून टाकावी अशी मागणी केली जात आहे. आग लागल्यानंतरही येथील घुसखोरी थांबलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भाजी मार्केटजवळील या इमारतीचा ताबा एपीएमसीकडे देण्यात यावा अशी मागणी आम्ही सिडकोकडे केली होती. पण प्रत्यक्षात इमारतीचे हस्तांतर झाले नाही. सोमवारी रात्री इमारतीला आग लागली. भविष्यात तशाप्रकारच्या घटना होवू नये यासाठी सिडकोने इमारतीचा योग्य वापर करावा. - शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, भाजी मार्केट.
भाडे वसुलीच्या वादातून लावली आग
By admin | Published: November 06, 2016 4:07 AM