मासळी उद्योगाला हवी आधुनिक जोड
By admin | Published: November 8, 2016 02:45 AM2016-11-08T02:45:07+5:302016-11-08T02:45:07+5:30
भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण संस्थेकडे मासेमारी व्यवसायासाठी लागणारी सर्वच माहिती उपलब्ध आहे.
उरण : भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण संस्थेकडे मासेमारी व्यवसायासाठी लागणारी सर्वच माहिती उपलब्ध आहे. सागरी जीवजंतू आणि जीवसृष्टीची हानी होणार नाही याची दक्षता मासळी व्यावसायिकांनी संस्थेशी संपर्क साधून माहिती उपलब्ध करून घ्यावी. तसेच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मासळी व्यवसायाला अत्याधुनिकतेची जोड देवून व्यवसाय फायदेशीर आणि अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा मच्छीमार व्यावसायिकांनी प्रयत्न करावा. यासाठी सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई तळाचे क्षेत्रीय निर्देशक डॉ. एल. रामलिंगम यांनी करंजा उरण येथे आयोजित कार्यक्रमातून केले.
भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई तळा, भारत सरकार कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, पशुपालन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, करंजा मच्छीमार संस्थेचे सदस्य गणेश नाखवा यांच्या प्रयत्नातून मच्छीमारांसाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई तळाचे क्षेत्रिय निर्देशक डॉ. एल रामलिंगम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांच्या अध्यक्षतेखाली करंजा-उरण येथील चाणजे ग्रा. पं. च्या मोकळ्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई संस्थेचे वैज्ञानिक डॉ. एस. के. द्विवेदी, वैज्ञानिक अशोक कदम, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य अलिबाग रायगड विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा,प्रगती मच्छीमार सह. संस्थेचे अध्यक्ष के. एल. कोळी, करंजा मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष नारायण नाखवा आणि मच्छीमार यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांच्या हस्ते झाले.
भारतीय मत्सिकी सर्वेक्षण संस्थेकडे मासेमारी व्यवसायासाठी लागणारी सर्वच माहिती उपलब्ध आहे. तसेच संस्थेकडे सर्वेक्षणासाठी अद्ययावत जहाजे आहेत. त्यामुळे मत्स्य साठे कोणत्या सागरी क्षेत्रातील कोणत्या जागेत आहेत हे शोधून काढण्याचे काम ही संस्था करीत आहे. मत्स्य साठ्याचे प्रमाण किती आहे याचीही पक्की माहितीही संस्थेकडे आहे. त्याशिवाय खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी मासेमारी कोणत्या क्षेत्रात आणि कशी करावी याची माहितीही करून दिली जाते. संस्थेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करण्याचे आवाहन रामलिंगम यांनी केले. (वार्ताहर)