प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:37 AM2017-09-25T00:37:08+5:302017-09-25T00:37:23+5:30
राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे.
नवी मुंबई : राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे. २५ सप्टेंबरला होणा-या मेळाव्यामध्येही प्रलंबित प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी २५ सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित असतात. यामुळे संघटनेच्यावतीने कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीचे निवेदन देण्यात येते. दोन दशकांमध्ये बहुतांश प्रश्न समान असून ते सोडविण्याकडे शासनाला अपयश येवू लागले आहे. वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यात यावा. बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमधील कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात यावे. माथाडी मंडळांवर कामगारांच्या प्रमाणामध्ये संघटनेच्या सदस्यांची नेमणूक करण्यात यावी. कळंबोली स्टील मार्केट, पुणे गुलटेकडी मार्केट, नाशिक बाजार समिती, मापाडी कामगार व इतर ठिकाणच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.
माथाडी कामगार नेते प्रत्येक मेळाव्यामध्ये पोटतिडकीने समस्या मांडतात. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री प्रश्न सोडविण्याची आश्वासने देतात. कामगार टाळ्या वाजवून नेत्यांच्या आश्वासनांचे स्वागत करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र बहुतांश प्रश्न सुटतच नाहीत. पुन्हा दुसºया वर्षीच्या मेळाव्यात त्याच प्रश्नांचे निवेदन द्यावे लागत आहे. जवळपास २० वर्षे त्याच प्रश्नांचे निवेदन द्यावे लागत असल्याचे आता कामगारांच्याही सर्व मागण्या पाठ होवून गेल्या आहेत. कामगारांचे प्रश्न युद्धपातळीवर सोडविण्यात यावेत, अशी मागणी केली जात असून आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती होणार का याकडे कामगारांचे लक्ष आहे.
पवार, फडणवीस एकत्र
राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून माथाडी कामगार पक्षाबरोबर आहेत. आमदार शशिकांत शिंदे चार वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असून नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर पाठविले आहे. परंतु एक वर्षापासून पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू आहे. माथाडी मेळाव्यामध्ये शरद पवार व देवेंद्र फडणवीस एकत्र येणार असून राजकीयदृष्ट्याही या मेळाव्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.