नवी मुंबई : मेथ्यॉक्युलॉन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा विदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेचार लाखांची ८७ ग्रॅम एमडी पावडर सापडली आहे. घणसोली येथील गुणाली तलावालगतच्या परिसरात सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
घणसोली परिसरात एमडी पावडर विक्रीसाठी विदेशी नागरिक येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री गुणाली तलाव परिसरात सापळा रचण्यात आला होता. या वेळी एक विदेशी व्यक्ती त्या ठिकाणी संशयास्पद वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, यामुळे त्यांनी सदर व्यक्तीची चौकशी करून झडती घेतली असता, त्याच्याकडे एमडी पावडर आढळून आली. चौकशीत त्याने तो सिएरा लिआन देशाचा नागरिक असून घणसोलीत इतर एका साथीदारासह राहत असल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी सेक्टर १६ येथील चिंतामणी अपार्टमेंटमधील त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला. या वेळी त्याच्या नायजेरियन साथीदाराने पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी शिताफीने त्याला अटक करून घराची झडती घेतली असता, घरातही एमडी पावडर सापडली. त्यानुसार डायलो इलिआसू (३४) व मायकेल होप एनडीयू (२९) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे ८७ ग्रॅम एमडी पावडर सापडली आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे ४ लाख ३७ हजार रुपये आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात एनडीपीएस व विदेशी नागरिक अधिनियमअंतर्गत रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांनी ही एमडी पावडर कुठून आणली व कोणाला विकणार होते, याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीच्या तसेच इतर गुन्ह्यांत नायजेरियन व्यक्तींचा सहभाग दिसून आलेला आहे.