लघुशंकेसाठी थांबलेल्यांना मारहाण करून चौघांनी लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 11:31 PM2020-10-02T23:31:58+5:302020-10-02T23:32:40+5:30
सानपाडा येथील घटना : रस्त्यावर लुटारूंच्या टोळ्यांचा वावर
नवी मुंबई : मासे आणण्यासाठी पनवेल येथून कुलाब्याला चालेल्या तिघांना मारहाण करून लुटल्याची घटना गुरुवारी सानपाडा येथील पुलाखाली घडली आहे. रस्त्यात कार थांबवून दोघेजण लघुशंकेसाठी खाली उतरले असता, हा प्रकार घडला. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नंदकुमार दाते यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. दाते हा अमोल गाढवे व अजिंक्य यांच्यासोबत कारने कुलाबा येथे मासे आणण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास चालले होते. या सर्वांचा मासेविक्रीचा व्यवसाय असून, ते नियमित या मार्गाने जात असतात. गुरुवारी पहाटे ते पनवेल येथून कुलाब्याला कारने जात असताना, सानपाडा पुलाजवळ त्यांनी लघुशंका करण्यासाठी कार थांबवली होती. यावेळी नंदकुमार व अमोल हे दोघे कारमधून खाली उतरले असता, पाठीमागून रिक्षातून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करत लुटायला सुरुवात केली. यावेळी अजिंक्यला जाग आली असता, त्याने मित्रांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु लुटारूंनी लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने अजिंक्यने त्यांच्या रिक्षाची चावी काढून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लुटारूंनी रस्त्यावर पडलेले दगड फेकून मारण्यास सुरुवात केल्याने त्यांनी त्यांच्यापुढे हार पत्करली. या जबरी लुटीमध्ये तिघेही जखमी झाले असून, त्यांचा मोबाइल व रोख रक्कम चोरीला गेली आहे. या घटनेनंतर त्यांनी तुर्भे पोलिसांकडे तक्रार केली असता, अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर त्यांनी रिक्षाचा नंबर पोलिसांना कळवला असून, त्याद्वारे पोलीस शोध घेत आहेत.
मारण्यास सुरुवात केल्याने अजिंक्यने त्यांच्या रिक्षाची चावी काढून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लुटारूंनी रस्त्यावर पडलेले दगड फेकून मारण्यास सुरुवात केल्याने त्यांनी त्यांच्यापुढे हार पत्करली.