कोपरखैरणे परिसरात गॅस गळती, अनेकांना उलटी, खोकल्याचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:16 AM2017-10-26T02:16:40+5:302017-10-26T02:16:55+5:30
नवी मुंबई : अज्ञात प्रकारच्या दुर्गंधीमुळे कोपरखैरणेत अनेकांना बाधा झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला.
नवी मुंबई : अज्ञात प्रकारच्या दुर्गंधीमुळे कोपरखैरणेत अनेकांना बाधा झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. अचानकपणे सुरू झालेला खोकला व उलटीच्या त्रासामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील एखाद्या कंपनीकडून दूषित गॅसची गळती होऊन नागरिकांंना बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.
बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोपरखैरणे स्थानक व त्यालगतचा सेक्टर ५ ते ८ परिसरात अनेकांना उग्र वासाचा त्रास होवू लागला होता. त्यामुळे रेल्वे स्थानकातून घराच्या दिशेने निघालेले अनेक जण अचानक सुरु झालेल्या खोकल्याने त्रस्त होते. त्यापैकी काहींना या दुर्गंधीचा त्रास असह्य झाल्याने उलटीचा त्रास होवू लागला. या दूषित वायूची बाधा झालेल्यांमध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात या अज्ञात दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. अनेकांना डोळ्यांना खाज सुटून मळमळ होवू लागल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. पर्यायी नागरिकांनी घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घ्याव्या लागल्या, तर रस्त्याने चालणाºयांना तोंडावर रुमाल बांधल्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. मात्र ही दुर्गंधी नेमकी कशाची याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होवू शकला नाही. त्यामुळे नगरसेवक शंकर मोरे यांनी संपूर्ण घटनेची माहिती पालिका विभाग अधिकारी अशोक मढवी व अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार मढवी यांनी कोपरखैरणे परिसरात ठिकठिकाणी जावून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तो उग्र वास नेमका कशाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत सुरु होता. याचदरम्यान खबरदारी म्हणून वाशी पालिका रुग्णालय येथे वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले. मात्र रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात दुर्गंधीचा त्रास कमी झाला तरीही रहिवाशांमधील भीती कायम होती.