लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उर्दूतून मराठी भाषेत गझल आली. इथल्या मातीत ती रु जली नाही तर मराठी मनाचे अंगच झाल्याची प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गझल संमेलनाच्या दुसर्या दिवशी आयोजित मुक्तचर्चेत ते बोलत होते. सुरेश भट यांनी मराठी मातीत आणलेले हे गझलचे वैभव असेच पुढे नेण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून, रविवारी या ठिकाणी मराठी गझलविषयी मुक्तचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी गझलप्रेमींनी विचारलेल्या शंका, अडचणींचे निराकरण करण्यात आले. या ठिकाणी आलेल्या गझलप्रेमींनी गझल आणि भावगीत मधील फरक, समीक्षकेच्या भूमिकेतून गझल, स्वर काफीया, व्याकरण आदींविषयी शंका विचारल्या. शब्दांमधील आशय प्रमाण मानून आणि गायकी दुय्यम स्थानावर ठेवून गझल पेश करण्याचा हुनर अवगत करण्याविषयीही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. शब्दांमधील आशय स्वरांनी सजवून रसिकांच्या काळजापर्यंत कसा पोहोचेल? याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये गझलप्रेमींना मार्गदर्शन करताना उर्दूचे अंधानुकरण न करता, मराठीत विचार मांडले जाणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला. तरुणपिढीदेखील गझल लिखाण करत असून, आजची पिढी अतिशय ताकदीने लिहित असल्याचे सांगत गझलकारांच्या वतीने या तरुण पिढीचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिलतील गझलप्रेमींनी वाद्यांच्या माध्यमातून गझल सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. गझलेचे नियम, तंत्र काटेकोरपणे सांभाळताना आशयघनताही तितकीच महत्त्वाची असल्याचे या संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांनी सांगितले. या मुक्तचर्चेत पनवेलचे गझलकार ए. के. शेख, पुण्याचे इलाही जमादार, प्रल्हाद सोनेवाने, इंदौरच्या शोभा तेलंग यांचा सहभाग होता. गझल सागर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या संमेलनाला सिडको तसेच मोहिनी आर्ट्स अकादमी यांचे सहकार्य लाभले आहे.
गझलचे शब्द क्रांतीचे मशाल व्हावेतगझलचे शब्द विश्वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत; तसे ते क्र ांतीची मशालही व्हावेत. गझल ही वर्तमानातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सूक्ष्मदृष्टीने विचार करण्यासाठी तत्पर असली पाहिजे. समाजातील दु:ख, दैन्य व दारिद्रय़ पाहून ती कळवळली पाहिजे, अन्याय पाहून ती चिडली पाहिजे, त्याविरोधात झुंजली पाहिजे व पेटून उठली पाहिजे, असे प्रतिपादन गझलकार प्रल्हाद सोनेवाने यांनी केले.
समीक्षकाच्या भूमिकेतून गझल पाहिली पाहिजे. गझलकार स्वत: समीक्षक होणे गरजेचे आहे. यामध्ये शब्दसंपदा असणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. - शोभा तेलंग, गझलकार, इंदौर