पनवेल : तळोजा वसाहतीमधील प्रदूषण ही नित्याचीच बाब आहे. गणेशोत्सवात घोट नदीमधील प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांना गणेश विसर्जन देखील करता आले नव्हते आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती उदभवली असून घोट नदीला प्रदूषणामुळे या नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.केमिकलयुक्त पाणी या नदीच्या पाण्यात मिसळल्याने उग्र वासामुळे या परिसरात फिरणे देखील अवघड झाले आहे. वारंवार अशा प्रकारचे प्रकार सर्रास घडत असल्याने ग्रामस्थांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. हाजीमलंग येथून उगमस्थान असलेली ही नदी घोट गाव, तळोजा मजकूर, पेठाळी मार्गी तळोजा खाडीत जाऊन मिळते. येथील स्थानिक रहिवासी तळोजा मजकूर या ठिकाणी या नदीपात्रात विधिवत दशक्रिया विधी देखील अनेक वर्षांपासून करीत आले आहेत. स्थानिकांच्या दृष्टीने पवित्र मानल्या जाणारी ही नदी आज प्रदूषणाच्या कचाट्यात सापडली आहे.रविवारी सुट्टीच्या दिवशी अचानकपूर्ण नदी काळवंडल्याचे येथील रहिवाशांच्या निदर्शनास आले. ही परिस्थिती पूर्ववत होईल, असा भावनेने येथील रहिवाशांनी याकडे दुर्लक्ष केल्यानंतर सोमवारी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे ग्रामस्थ व रहिवाशांच्या निदर्शन आल्यानंतर ग्रामस्थांनी स्थानिक नगरसेवकाच्या सोबत तळोजा पोलीस ठाणे या घटनेची दोषींवर कारवाईची मागणी केली. एम ब्लॉक परिसरात येणा-या रसायनमिश्रित वाहिनी फुटल्याने संबंधित प्रकार झाल्याची माहिती सूत्रामार्फत मिळाली आहे. या घटनेची दखल घेऊन येथील ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेतली. संबंधित घटनेतील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.उग्र वासामुळे मॉर्निंग वॉक बंदया नदीच्या मात्राजवळ तळोजा वसाहतीची निर्मिती करण्यात आली आहे. येथील रहिवासी संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. अनेक रहिवासी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात. मात्र दोन दिवसांपासून या ठिकाणी नदी प्रदूषणामुळे उग्र वास सुटल्याने अनेक रहिवासी दोन दिवसांपासून मॉर्निंग वॉकला गेले नसल्याचा खुलासा स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी यावेळी केला.
घोट नदी पुन्हा काळवंडली; संतप्त ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 6:07 PM