'तो' अपघात एसटी बस चालकामुळेच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 05:59 AM2020-11-28T05:59:30+5:302020-11-28T05:59:39+5:30
सातारापरेल बसचा २६ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता पनवेल हद्दीतील कोन गाव येथे अपघात झाला. ट्रेलर बसला घासून गेल्याने या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला.
मयूर तांबडे
नवीन पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी एसटीला झालेला अपघात हा बसचालकाच्या चुकीमुळे झालेला आहे. तालुका पोलिसांच्या तपासानंतर खरा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, त्याने अपघात केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाला आहे. अपघातात जखमी झालेल्या ७ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सातारापरेल बसचा २६ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता पनवेल हद्दीतील कोन गाव येथे अपघात झाला. ट्रेलर बसला घासून गेल्याने या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर १३ प्रवासी जखमी झाले होते. बसचालक जगन्नाथ राऊत (४८) यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात ट्रेलरचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा अपघातात बसचालकाची चूक असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रेलरचालकाचा शोध घेतला असता त्याने बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रेलरला पाठीमागून धडक दिली असल्याचे सांगितले.
फिर्यादच होती खोटी
बसचालक जगन्नाथ राऊत यांनी खोटी फिर्याद देऊन पहाटे दीडच्या सुमारास ट्रेलरने बसला धडक दिली असल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र ही बाब खोटी असल्याचे समजतात पोलिसांनी जगन्नाथ राऊत विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.