नवी मुंबई : नागरिकांना समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी किंवा इतर बाबतीत माहिती काढण्यासाठी हेरगिरी काळाची गरज असल्याचे मत पहिल्या महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांनी व्यक्त केले. यासाठी आजवर कायदा होऊ न शकल्याची खंतही व्यक्त केली.रविवारी ७ फेब्रुवारी रोजी मिती ग्रुपच्या उत्तरा मोने आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. या कार्यक्रमात पंडित यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना आलेली आव्हाने आणि त्यावर मात करत त्यांनी मिळवलेल्या यशाविषयी चर्चा करण्यात आली.डिटेक्टिव्हसाठी परदेशात लायसन्स दिले जातात. त्यामुळे ते पोलिसांप्रमाणे काम करू शकतात. आपल्या देशात डिटेक्टिव्हसाठी लायसन्स दिले जात नाही. त्यामुळे अनेक वेळा अडचणी येत असल्याचे सांगत डिटेक्टिव्ह काळाची गरज असून, याबाबत कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे पंडित म्हणाल्या. आलेल्या प्रसंगाशी दोन हात कसे करायचे, याचे ज्ञान लहानपणापासून असल्याने कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नसल्याचे त्यांनी सांगितले. हेरगिरी करताना घडलेले अनेक किस्सेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीची लोक अन्याय सहन करायचेे. आता मोहासाठी अनैतिक गोष्टींचे आकर्षण वाटले की ते वाहत जातात. गैरफायदा घेणे, ब्लॅकमेल करणे, अशा गोष्टीही घडतात. त्यामध्ये आत्महत्या हा पर्याय नसून, झालेली चूक सावरण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समस्येतून संधी शोधली पाहिजे आणि त्यातून आपले पुढचे आयुष्य घडवले पाहिजे, असा सल्ला देत लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच ऐश्वर्य असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कामाची नोंद अनेकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असून, तो आमचा हेतू साध्य झाल्याचे मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांनी सांगितले. बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्या कार्याचे कौतुक करत पंडित या फक्त महाराष्ट्राचा अभिमान नसून रणरागिणी असल्याचे म्हटले.मुलांना वेळ देणे गरजेचेपालक कामांमुळे त्रासलेले असतात. त्यामुळे पालक आणि मुलांमधील संवाद फार कमी झाला आहे. आपली मुले बाहेर काय करतात, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असून मुलांच्या मनात चांगले विचार रुजविणे, मुलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना वेळ देणे तितकेच गरजेचे आहे, अनेकदा मुले व्यसनांकडे वळत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
हेरगिरीचे लायसन्स मिळण्यासोबतच कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 2:11 AM