घणसोली परिसरात शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 11:35 PM2020-10-02T23:35:12+5:302020-10-02T23:35:30+5:30
वाहतुकीस अडथळा : कारवाईची मागणी
नवी मुंबई : सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, सोशल डिस्टन्सचे पालन न करता, खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. हे प्रकार त्वरित थांबविण्यासाठी घणसोली परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जोर धरू लागली आहे.
सुमारे २ लाख लोकसंख्या असलेल्या घणसोली परिसरातील पाच गावे आणि नोड्सचा समावेश असलेल्या एफ विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांची ठिकाणे - घणसोली रेल्वे स्टेशन पूर्व आणि पश्चिमेला अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू आहे. घणसोली स्टेशनसमोरील न्यू लाइफ हॉस्पिटलसमोरील मोकळ्या भूखंडावर फळे, भाजीपाला, व्यापारी संकुलाच्या बाहेर मार्जीनल स्पेसमध्ये अनेक नवीन मोटार सायकल, हावरे चौकाजवळ सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेक दुकाने फेरीवाले, तसेच हार्ड वेअर दुकानातील सामान, मुख्य रस्त्यालगत वाहने दुरुस्तीची दुकाने थाटण्यात आलेली आहेत.
घणसोली गावात माजी सरपंच दगडू चाहु पाटील चौक, गावदेवी मंदिर परिसर, साई सदानंदनगर ते घणसोली डी मार्ट मॉल परिसर, गावदेवी वाडी रोड ते स्वातंत्र संग्राम चौकापर्यंत वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरविण्यात येत आहे.
रबाले रेल्वे पादचारी भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार, तळवली नाका, रबाले-गोठीवली गाव रस्ता घणसोली गावठाणात काही दुर्घटना घडल्यास, अग्निशमन दलाची गाडी किंवा पोलिसांच्या वाहनांनाही गर्दीतून वाट काढणे मुश्कील होईल, अशी परिस्थिती घणसोली विभागाची झालेली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीने या गर्दीला घाबरून घरातून बाहेर जाणेही कठीण झाले आहे.
पंतप्रधान निधी योजनेंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी परवाना देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांचे फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
- अमरीश पटनिगीरे,
उपायुक्त, अतिक्रमण विभाग, मुख्यालय