विमानतळाच्या भूमिपूजनाची घाई; निवडणुकांवर डोळा, ग्रामस्थांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:32 AM2018-02-15T03:32:05+5:302018-02-15T03:32:09+5:30
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरणारे अनेक प्रश्न अद्यापि, जैसे थे आहेत.
नवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरणारे अनेक प्रश्न अद्यापि, जैसे थे आहेत. काही मुद्द्यांवर प्रकल्पग्रस्तांचा विरोध आजही कायम आहे. या वस्तुस्थितीला बगल देत राज्य सरकारने विमानतळ प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे. केवळ आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून भूमिपूजनाचा सोपस्कार केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. जीव्हीके कंपनीला विमानतळ उभारणीचा ठेका देण्यात आला आहे. फायनान्शीयल क्लोजर सादर केल्यानंतर ही कंपनी विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. सध्या प्रकल्पपूर्व कामे सुरू आहेत. यात उलवे टेकडीची उंची करणे, जमिनीचे सपाटीकरण, उपºया विद्युतवाहिन्या भूमिगत करणे, तसेच उलवे नदीचे पात्र बदलणे आदी कामांचा समावेश आहे. या कामाला एक ते दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच विमानतळ उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. शिवाय, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधित काही प्रश्न अनुत्तरित आहेत. विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील दहा गावांच्या स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. विमानतळाच्या कंत्राटावरून स्थानिकांत संघर्ष सुरू आहे. दिवसाआड आंदोलन करून काम बंद पाडले जात आहे. ही वस्तुस्थिती असताना अचानक प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर २०१९मध्ये विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा दावा राज्य सरकारकडून वेळोवेळी केला जात आहे. शिवाय, लोकसभेच्या निवडणुकासुद्धा २०१९मध्येच आहेत. प्रकल्पाची सध्याची कामाची गती पाहता विमानतळाची डेडलाइन हुकण्याची अधिक शक्यता आहे. असे असले तरी केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.