नवी मुंबई : उरण फाटा ते बेलापूर आम्रमार्गावर थाटलेल्या बेकायदा ट्रक टर्मिनलवर सिडकोने बुधवारी धडक कारवाई केली. या ठिकाणी उभारण्यात आलेले दोन अनधिकृत केबिन जमीनदोस्त करून पार्क करून ठेवलेली अवजड वाहने काढण्यात आली. महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उरण फाटा ते बेलापूर किल्ले गावठाण आम्रमार्गावरील सेक्टर २३ येथील भूखंड क्रमांक १५ वर मागील काही महिन्यापासून बेकायदा ट्रक टर्मिनल सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी अवजड ट्रक, रसायनाने भरलेले टँकर पार्क केले जात होते. विशेष म्हणजे या वाहनधारकांकडून पार्किंग शुल्कही आकारले जात होते. यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत सिडकोने संबंधितांना नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही बेकायदा पार्किंग सुरूच राहिल्याने अखेर बुधवारी धडक कारवाई करून हे अनधिकृत ट्रक टर्मिनल जमीनदोस्त करण्यात आले. याअंतर्गत सुमारे ३३७२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. तसेच या मोहिमेदरम्यान बेलापूर सेक्टर २0 येथील सुरू असलेले एका बेकायदा बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी.बी.राजपूत, सह नियंत्रक गणेश झीने आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
बेकायदा ट्रक टर्मिनल जमीनदोस्त; सिडकोची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:14 AM