नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सातारा येथे ५ फेब्रुवारी १९३६ रोजी जन्म झालेल्या नीळकंठ ज्ञानेश्वर गाेरे ऊर्फ बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्याची वारकरी संप्रदायाची परंपरा १३५ वर्षांहून मोठी आहे. बाबा महाराजांचे आजोबा दादा महाराज गोरे हे त्या काळातील उत्कष्ट मृदंगवादक होते. बाबा महाराजांनी मृदंगवादनाचे धडे आजोबांसह वडील ज्ञानेश्वर महाराजांकडून घेतले.
पुढे वारकरी संप्रदायातील वीणेकरी पांडुरंग महाराज जाधव यांच्या कन्या दुर्गाबाई ऊर्फ रुख्मिणी यांच्याशी १९५४ साली बाबा महाराजांचा विवाह झाला. या काळात फर्निचर विक्रीचा व्यवसाय ते करीत होते. १९५० ते १९५६ असे सहा वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. त्यानंतर पाच ते सहा लाखांची उलाढाल असलेला हा छोटेखानी उद्योग त्यांनी मिळेल त्या भावाने विकून कीर्तन करणे सुरू केले. त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला असता तर ते देशातील आघाडीचे फर्निचर विक्रेते राहिले असते.
कोट्यवधींचे उत्पन्न असलेले व्यापारी-व्यावसायिक बनले असते; परंतु कोट्यवधी रुपये मिळवूनही मला कोणी ओळखले नसते. ती ओळख अखंड देशात कीर्तनाने दिली, अशी आठवण स्वत: बाबा महाराजांनीच मागे एका मुलाखतीत सांगितल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले. वकिलीच्या शिक्षणासह शास्त्रीय संगीत शिकलेल्या बाबा महाराजांनी वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ‘आकाशवाणी’वर गायनास सुरुवात केली होती.
रुक्मिणीताईंची मोलाची साथ
वडिलांच्या सांगण्यावरून फर्निचर विक्री बंद करून कीर्तन, निरुपणास सुरुवात केल्यानंतर ते महाराष्ट्रात त्यांच्या ओघवत्या कीर्तनशैलीमुळे लोकप्रिय झाले. कीर्तनासाठी त्यांना वारंवार दौरे करावे लागत; परंतु यात पत्नी रुक्मिणी सातारकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
मुख्यमंत्र्यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे होत्या. तत्पूर्वी ऐरोलीचे आ. गणेश नाईक यांनी अंतिम दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
अंतिम दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
बाबा महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यभरातून त्यांच्या अनुयायांनी नवी मुंबईकडे धाव घेतली. सकाळी त्यांचे निवासस्थान व सायंकाळी नेरुळमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दर्शन घेताना सर्वांना अश्रू अनावर होत होते. सायंकाळपर्यंत सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, ‘मनसे’चे गजानन काळे यांच्यासह नवी मुंबईमधील बहुतांश सर्व माजी नगरसेवक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रामधील नागरिकांनी त्यांचे दर्शन घेतले.
नवी मुंबईमध्ये अध्यात्माची पायाभरणी
बाबा महाराज सातारकर यांचे नवी मुंबईशी तीन दशकांचे ऋणानुबंध आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी येथेच वास्तव्य केले. इथेच शेवटचा श्वास घेतला. नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी त्यांनी केली. येथे अखंड नामस्मरण व भजन, कीर्तन सुरू असते. शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर माथाडी कामगारांसाठी कोपरखैरणेमध्ये घरे उपलब्ध करून दिली. कोपरखैरणे गाव व परिसरामध्ये १९९२ मध्ये अखंड हरिनाम सप्ताहासाठी बाबा महाराज सातारकर यांना आमंत्रण देण्यात आले. तेव्हापासून महाराजांचे नवी मुंबईशी ऋणानुबंध जुळले. सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, सातारा समूहाचे नाना निकम यांच्यासह विविध संस्थांनी महाराजांच्या कीर्तन सोहळ्यांचे नियमित आयोजन करण्यास सुरुवात केली. नवी मुंबईमधून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे सहज शक्य होत असल्यामुळे महाराजांनी आयुष्याच्या उत्तरार्धात येथेच वास्तव्य करण्यास सुरुवात केली. नेरूळमधील त्यांच्या निवासस्थानीही भक्तांची नेहमी वर्दळ असायची.
लोणावळ्यात १६ एकरवर मंत्र मंदिर
ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये लोणावळ्यामधील श्री क्षेत्र दुधिवरे याचा समावेश आहे. तेथे १६ एकरवर मंत्र मंदिर या अध्यात्म केंद्राची उभारणी त्यांनी केली. संत निवास व भक्तनिवासाची तेथे सोय करण्यात आली आहे.
विचारांना कृतीची जोड देऊन लोणावळामध्ये भव्य अध्यात्म केंद्राची उभारणी केली. लोणावळापासून ८ किलोमीटर अंतरावरील दुधीवरे येथे जय जय राम कृष्ण हरि या बीजमंत्रावर आधारित हे मंदिर आहे. राम पंचायतन, श्री विठ्ठल रूक्मिणी व राधाकृष्ण या देवांची स्थापना केली आहे. वारकरी तत्त्वज्ञानावर आधारित या मंदिराच्या कळसावर संत तुकाराम महाराज यांची मूर्ती बसविण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव महाराज व संत एकनाथ यांच्या मूर्तींचीही प्राणप्रतिष्ठापणा केली आहे. सहा खोल्यांचे संत निवास, ४४ खोल्यांचे भक्तनिवास येथे असून रोज ५०० नागरिकांना अन्नदान केले जात आहे. दुधीवरे तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.