मुंबई : देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या सैनिकांचा आदर्श नव्या पिढीपुढे राहणे गरजेचे आहे. त्यांची सतत आठवण तेवत ठेवण्यासाठीचे प्रयत्न प्रशासन करीत आहे आणि नागरिक म्हणून आपणही केले पाहिजे, असे प्रतिपादन पी. एस. के मुथुरलिंगम यांनी रविवारी षण्मुखानंद सभागृहात केले. मराठीया मनिला थेवर मुनेत्रा पेरवाई यांच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त ‘१७ व्या व १८ व्या शतकातील थेवर समुदायाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मराठीया मनिला थेवर मुनेत्रा पेरवाईचे अध्यक्ष मुथुरलिंगम बोलत होते. देशासाठी अनेक सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यातील अनेकांच्या कार्याबद्दल आपणास माहिती नसते. अशा सैनिकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक पुली थेवर, पासुपोन थेवर, मरुधु पेडियार, राणी वेलू नाचियार, उक्कीरापंडी थेवर यांच्या कार्याची माहिती लघुपटाद्वारे देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ विद्यार्थी, मूकबधिर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी द नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. वरदराजन, अभिनेत्री मधू उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श नव्या पिढीपुढे हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 2:31 AM