वैभव गायकर
पनवेल : पनवेल शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांचा राबता वाढत चालला आहे. विशेष म्हणजे वाहतूक विभागानेच लादलेल्या नियमांची पायमल्ली होत असून याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे बंदी असतानाही शहरात सर्रासपणे अवजड वाहनांचा शिरकाव दिसून येतो. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
पनवेल शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. पनवेल तालुक्यात १५0 पेक्षा जास्त गावे व आदिवासी पाडे आहेत. पनवेल ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने विविध कामे व खरेदीसाठी शहरात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे शहरात पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. पार्किंगचे नियोजन नसल्याने वाहनधारक वाटेल तशी वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या परिस्थितीला अटकाव करण्यास वाहतूक विभागाला सपशेल अपयश आले आहे. यात आता अवजड वाहनांची भर पडली आहे. शहरात बंदी असतानाही अवजड वाहने सर्रासपणे शहरात शिरकाव करतात. विशेष म्हणजे निमुळत्या व एक मार्गी रस्त्यावर सुद्धा या अवजड वाहनांचा बिनबोभाट वावर दिसत असल्याने शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा वाहतूककोंडीच्या गर्तेत सापडले आहेत. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेक ठिकाणच्या रस्त्यावर वन-वेचे नियोजन केले आहे. रस्त्यावर तशा आशयाचे फलकही लावले आहेत. मात्र या फलकांकडे कानाडोळा करीत दोन्ही बाजूने वाहने सुरू असल्याचे चित्र अनेक भागात दिसून येते. या परिस्थितीकडे वाहतूक पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.पनवेल शहरात न्यायालय, मोठ्या प्रमाणात इस्पितळे, सराफा बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँकांची संख्या मोठी आहे. कर्नाळा सर्कल येथील भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. या परिसरात सुद्धा नियमित वाहतूककोंडी पाहावयास मिळते.शहरात कर्नाळा सर्कलजवळ एकच अधिकृत वाहनतळ आहे. परंतु शहराचा वाढता विस्तार व त्याअनुषंगाने वाढणारी लोकसंख्या पाहता आणखी वाहनतळाची गरज निर्माण झाली आहे.पनवेल शहरात आजमितीस रिक्षांची संख्याही लक्षणीय आहे. दुचाकीची संख्या वाढली आहे. चारचाकी वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरासमोर वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पनवेलचे भविष्यात वाढणारे महत्त्व लक्षात घेवून वाहतूककोंडीसंदर्भात आतापासूनच ठोस नियोजन करण्याचीगरज असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे.बंदी झुगारून अवजड वाहनांचा प्रवेशशहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी आहे. शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी देखील शहरात अवजड वाहनांचा मुक्त वावर असल्याचे पाहावयास मिळते.पनवेल शहरातील या समस्यांच्या संदर्भात पनवेल वाहतूक शाखेच्या अधिकाºयांना सूचना देण्यात येतील.- अरुण पाटील,सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई वाहतूक शाखानो एंट्रीत सीसीटीव्हीची मागणीपनवेल शहरात काही ठिकाणी वन-वे करण्यात आले आहे. याठिकाणाहून चारचाकी वाहनांना देखील बंदी असताना सर्रास या मार्गावरून वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी कफचे अध्यक्ष मनोहर लिमये यांनी केली आहे.