नवी मुंबई : एनआरआय पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींकडून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. मराठी नागरिक राहत असलेल्या घरांमध्ये चोरी करायची नाही. आठवड्याच्या शेवटी व सण उत्सवाच्या दिवशीही गुन्हेगारी कारवाया बंद करणाऱ्या या चोरट्यांनी पैशातून घर खरेदीसह गावामध्ये पाणीपुरवठा योजना राबविल्याचेही उघडकीस आले आहे.एनआरआय पोलिसांनी कौशल्याने या टोळीचे म्होरके ज्ञानेश्वर बबन बांगरे व अनंत भिकू कांबळे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १३० तोळे सोन्याचे दागिन्यांसह ४१ लाख ७८ हजारांचा ऐवज हस्तगत केले आहेत. दागिने विकत घेणाऱ्या रतनप्रकाश यालाही अटक केली आहे. आरोपींनी एनआरआय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ४, सानपाडा, तळोजा, सीबीडी व कोपरखैरणेमध्ये प्रत्येकी १, रबाळे परिसरात ५, न्हावा शेवामध्ये ३, नेरूळमध्ये ३, खारघरमध्ये ७ ठिकाणी घरफोडी केली असल्याचे कबूल केले आहे. वाशीमधील तामसी गावामध्ये राहणारा ज्ञानेश्वर सुरक्षारक्षक म्हणून काही दिवस काम करत होता. दुसरा आरोपी अनंत कांबळे याचा केबल व्यवसाय व गावाकडे राइस मिल आहे. पनवेलमधील पेट्रोलपंपावर या दोघांच्या वाहनांची टक्कर झाली. पहिल्यांदा भांडण व नंतर मैत्री झाली. दोघांनीही घरफोडी करण्याचा निर्णय घेतला. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने काही क्षणात दरवाजाचे टाळे उघडायचे व घरांमध्ये जाऊन किमती साहित्य घेऊन पळ काढत होते. २०१७ पासून त्यांनी तब्बल २६ ठिकाणी घरफोडी केली असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला व परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.चोरट्यांनी स्वत:साठी आचारसंहिता घालून घेतली असल्याचेही तपासामध्ये उघड झाले. एक आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ताही होता. दोघांनीही कोणत्याही स्थितीमध्ये मराठी नागरिक राहत असलेल्या घरामध्ये चोरी करायची नाही, असे ठरविले होते. आतापर्यंत एकदाही मराठी माणसाच्या घरी चोरी केलेली नाही. दुपारी ११ ते ३ या वेळेमध्येच घरफोडी करायची. चोरी करताना घरामध्ये कोण नाही हे तपासण्यासाठी बेल दाबायची. घराचा दरवाजा उघडला तर काहीतरी कारण देऊन तेथून पळ काढायचा. घरात कोणी नसल्यास कुलूप तोडून चोरी केली जायची. बेल दाबल्यानंतर त्या घरातील कोणी आवाज वाढवून बोलले तर त्या घरामध्ये पाळत ठेवून चोरी करायचीच, असा निर्धार ते करत होते. रविवार, सण व उत्सवाच्या काळामध्ये चोरी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. वाशीमध्ये राहणाºया ज्ञानेश्वरने मूळ गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठीच्या योजनेला मदत केली होती. तळोजाजवळ घरही खरेदी केल्याचे निदर्शनास आले. अनंत याने केबल व्यवसायासाठीचे साहित्य घेतल्याचेही उघडकीस आले आहे.>तपासामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांची नावेघरफोडी करणाºया टोळीतील आरोपींना पकडण्यामध्ये एनआरआय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख, रवींद्र पाटील, भूषण कापडणीस, जगदीश पाटील, दीपक सावंत, सचिन बोठे, किशोर फंड, संदीप बंडगर, गोकुळ ठाकरे, अजित देवकाते, अमोल भोसले यांनी सहभाग घेतला. आरोपींच्या शोधासाठी मोबाइलची माहिती तपासण्यात आली. यामध्ये जगदीश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
चोरट्यांच्या आचारसंहितेमुळे तपास अधिकारीही थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:34 AM