उरण : जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु जेएनपीटी प्रकल्पगस्त गावांचा विकास न झाल्याने येथील प्रकल्पगस्तांंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जेएनपीटीबाधित महालन विभागातील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी बंदर प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी दिली.जेएनपीटी बंदराच्या चेअरमनपदी संजय सेठी यांची नियुक्ती झाल्याने उरण महालन विभाग सरपंच कमेटीचे अध्यक्ष व जसखार गावाचे सरपंच दामूशेठ घरत यांनी जेएनपीटीच्या मालमत्ता टॅक्ससंदर्भात व इतर प्रलंबित प्रश्नासंदर्भात संजय सेठी यांची बुधवारी भेट घेऊन त्यांचे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने स्वागत केले. यावेळी उरण महालन विभागातील जसखार, सोनारी, करळ, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, जासई, चिर्ले, धुतूम, पागोटे, नवघर आदी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी आपल्या पिकत्या शेतजमिनी अल्प किमतीत संपादित करून दिल्या.येथील प्रकल्पगस्त गावांचे योग्य पुनर्वसन, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बंदर प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु ४० वर्षांच्या कालावधीनंतरही या प्रकल्पगस्त गावातील रहिवाशांना नागरी सुविधा, नोकरी, थकीत टॅक्ससाठी झगडावे लागत आहे. थकीत असणारा मालमत्ता कर कायद्याच्या तरतुदीनुसार त्या गावांना दिला जाईल असे बोर्ड मिटिंगमध्ये ठरले आहे,तसेच जेएनपीटीबाधित ग्रामपंचायती हद्दीतील विकासकामे यापुढे जेएनपीटीच्या सीआरएस फंडातून करण्यात येणार आहेत आणि जसखार गावच्या चारही बाजूने जात असलेल्या रस्त्यामुळे ज्या घरांचे नुकसान होणार आहे त्या घरांच्या जागेसंदर्भात जेएनपीटीने ग्रामपंचायत जसखारकडून एक निवेदन देण्यात यावे त्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी बंदराच्या माध्यमातून पुढाकार घेऊ, असे आश्वासन चेअरमन संजय सेठी यांच्याकडून देण्यात आले.>घरे उठविण्याचा प्रशासनाचा घाटसिंगापूर पोर्टच्या रस्त्याआड येणाºया जसखार गावातील रहिवाशांची अनेक घरे उठविण्याचा घाट प्रशासन घालत असेल तर ते योग्य नाही. उलट त्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच येथील प्रकल्पग्रस्तांचे असणारे इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या वेळी जेएनपीटी बाधित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महालन विभाग सरपंच कमेटीचे अध्यक्ष दामूशेठ घरत यांनी केली.
प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी जेएनपीटी सहकार्य करेल - संजय सेठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:29 PM