कामोठेत जलवाहिनी फुटली, पनवेलसह नवी मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:05 AM2017-09-24T02:05:06+5:302017-09-24T02:05:12+5:30
मोरबे धरणातून नवी मुंबईकडे येणारी मुख्य जलवाहिनी सिडको ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे फुटली. सकाळी ११ वाजता घडलेल्या घटनेमुळे ५० फूट उंच कारंजे तयार झाले होते.
पनवेल : मोरबे धरणातून नवी मुंबईकडे येणारी मुख्य जलवाहिनी सिडको ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे फुटली. सकाळी ११ वाजता घडलेल्या घटनेमुळे ५० फूट उंच कारंजे तयार झाले होते. लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पाच तासांच्या प्रयत्नांनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले, तरी रविवारीही नवी मुंबईमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
खालापूर तालुक्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे मोरबे धरण आहे. धरणाजवळील भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र असून, तेथून २०४२ मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून पाणी नवी मुंबईपर्यंत आणले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता कामोठे येथील के. ई. एल. एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजजवळ सिडकोचे ठेकेदार गिरीश एन्टरप्राइजच्या वतीने रोडचे काम करण्यात येत होते. पोकलनचालकाच्या निष्काळजीमुळे जलवाहिनीचा एअर वॉल फुटला व पाण्याचे कारंजे ५० फूट उंच उडू लागले.
महामार्गावरून जाणाºया नागरिकांचेही लक्ष याकडे वळल्याने क्षणामध्ये शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. पाण्याचा प्रवाह खूप असल्याने लाखो लिटर पाणी वाया जाऊ लागले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अभियंत्यांचे पथक घटनास्थळी पाठविले. नवी मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात येऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले होते. दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाºयांनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून, पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे.
नवी मुंबईचा पाणीपुरवठा ४ वाजल्यापासून सुरू केला असला, तरी जलवाहिनीमधून वाया गेलेले पाणी आणि पाच तास पाणीपुरवठा बंद करावा लागल्याने सायंकाळी अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रविवारीही महापालिका क्षेत्रामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
सिडकोच्या ज्या ठेकेदाराच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे, त्यांच्याकडून दुरुस्तीसाठी झालेला खर्च वसूल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर महापालिकेचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे व त्यांच्या सहकाºयांनी तातडीने उपाययोजना केल्यामुळे वेळेत दुरुस्तीचे काम करता आले.
महापालिकेच्या वतीने आवाहन
जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ पत्रक काढून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
पाणी पूर्ववत होण्यास १० ते १२ तासांचा कालावधी लागणार आहे. यामुळे २३ सप्टेंबरला सायंकाळी शटडाउन घोषित करण्यात आला आहे. २४ सप्टेंबरलाही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाच तासांनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण
जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिकेचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, एस. ए. मोरे., ए. सी. मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान पाहून भोकरपाडा येथून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाण्याचा प्रवाह थांबताच तत्काळ एअर वॉल दुरुस्त करून घेऊन सायंकाळी ४ वाजता पाणीपुरवठा पूर्ववत केला. अधिकारी व कर्मचाºयांच्या दक्षतेमुळे तत्काळ पाणीगळती थांबविण्यात यश मिळविले.
ठेकेदाराची चूक
सिडकोच्या वतीने कामोठेमधील केईएल कॉलेजवळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. फोकलनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एअर वॉल तुटला व मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
२०४२ मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने हा प्रकार घडला असून, महापालिकेने दुरुस्तीचा सर्व खर्च ठेकेदाराकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
२० लाख लिटर पाणी वाया
कामोठेमधील गळतीने तब्बल २० लाख लिटर पाणी वाया गेले आहे. पाणीपुरवठ्यासाठीच्या राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला रोज १३५ लिटर पाणी पुरविणे आवश्यक आहे; परंतु नवी मुंबई महापालिका २०० लिटर पाणी देत आहे. १० हजार नागरिकांना एक दिवस पुरेल एवढे पाणी वाया गेले असल्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येताच तत्काळ नवी मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. संध्याकाळी ४ वाजता पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, रविवारीही काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
- मनोहर सोनावणे,
कार्यकारी अभियंता महापालिका