कुणबी समाजाने संघटित होण्याची गरज, वाशीत मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:53 AM2018-07-09T03:53:37+5:302018-07-09T03:53:56+5:30
कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
नवी मुंबई - कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या समस्या निकाली काढण्यासाठी कुणबी समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या वतीने वाशीत, कुणबी समाजाच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यास विविध जिल्ह्यांतील कुणबी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष भूषण बरे, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष अविनाश लाड, युवा अध्यक्ष माधव कांबळे, सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते. कोकणात मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे वास्तव्य असूनही, त्यांना स्वत:च्या समस्यांचे गाºहाणे मांडण्यासाठी हक्काचा एकही लोकप्रतिनिधी नाही. आजही त्यांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तर इतर लोकप्रतिनिधींकडून कुणबी समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. समाजाचे बहुतांश तरुण उच्चशिक्षित असतानाही त्यांच्यापुढेही नोकरी व्यवसायाच्या समस्या आहेत, त्यामुळे कुणबी समाजाने संघटित होण्याचे आवाहन समाजोन्नती संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी समाजासाठी राजकीय सत्तेचे दार उघडण्याकरिता एकजूट होण्याचेही आवाहन करण्यात आले. तसेच कुणबी समाजाच्या भावना मांडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना संघाच्या वतीने पत्र पाठवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. समाजातील व्यक्ती जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये कार्य करत असतील, त्यांनी कुणबी समाजाच्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली. असे झाले तरच समाजाचा पाया भक्कम होऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या निकाली लागतील, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. शहरी भागात वास्तव्य करणारा कुणबी समाज जागरूक झालेला आहे; परंतु ग्रामीण भागात अद्यापही मत परिवर्तनाची गरजही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.