रसायनी : गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मूर्तिकला केंद्रात कारागीर मूर्तींवरून रंगाचा शेवटचा फिरवण्यात व्यस्त आहेत. मात्र, यंदा गणेशमूर्तीला मागणी नसल्याची खंत कारागिरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मोहोपाडा-शिवनगर येथील वैभव कला केंद्राचे पुरुषोत्तम यशवंत गीध यांच्या कला केंद्रात मूर्तींच्या सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ५५ वर्षांपासून त्यांचा गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. दरवर्षी दीड-दोन महिने अगोदर बुकिंग होत असे. यंदा गणेशोत्सव एक महिन्यावर आलेला असताना अजूनही बुकिंगला सुरुवात झाली नसल्याची माहिती सचिन आणि वैभव गीध या बंधुंनी दिली. याचा मोठा फटका बसणार असल्याची चिंता व्यक्त के ली आहे.
कोकणात व एकूणच महाराष्ट्रातच घरोघरी दीड, पाच, सात दहा दिवसांचे गणपती असतात. कोरोनामुळे गर्दी टाळायची असल्याने यंदा गणेशाची प्रतिष्ठापना करायची की नाही, या द्विधा अवस्थेत नागरिक आहेत. काही प्रसिद्ध केंद्रांच्या मूर्ती देशाच्या विविध भागांत व परदेशीही जातात. या वर्षी लॉकडाऊनमुळे दूरवर वाहतुकीने मूर्ती पोहोचविणे शक्य नसल्याने आर्डर रद्द कराव्या लागल्या. नियमांचे पालन करून सार्वजनिक उत्सवासाठी तीनफुटी व घरगुती उत्सवासाठी दोनफुटी आणि शाडू मातीच्या मूर्ती बनविल्याचे सचिन गीध यांनी सांगितले. कमी उंचीच्या मूर्तींची वाहतूक व हाताळणी सुलभ होते. कोरोनाचे विघ्न दूर होऊन बाप्पाचे आगमन निर्विघ्न होऊ दे, असे गणेशभक्त साकडे घालत आहेत.