यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर (नवी मुंबई)
देशात लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले की संधीसाधू आयाराम गयाराम यांच्याबरोबरच कोणता पक्ष आणि कोणते चिन्ह याचा थांगपत्ता लागत नाही. मतदारांची अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. ही लोकसभेची निवडणूक फारच महत्त्वाची आहे असे एकंदरीत राजकीय ढवळलेल्या वातावरणावरून वाटते. इलेक्टोरल बॉण्ड घोटाळा, पीएम केअर फंडांत कोट्यवधींची रक्कम, कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला म्हणून ईडी, सीबीआय, आयटी यांचे धाडसत्र पाहता एक गोष्ट लक्षात येते की, ही कोट्यवधींची रक्कम ही सर्वसामान्य जनतेच्या करातून भ्रष्टाचारी राजकारण्यांनी केलेली लूट आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च हा ९५ लाख एवढाच करण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घालून दिले असले तरी उमेदवार त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च करतात, ही लपून राहिलेली गोष्ट नाही.
मतदारांना आमिषेही दाखवली जातात. पोलिसांच्या धाडीत ड्रग्ज तसेच बनावट दारूचा साठा, खोट्या नोटा जप्त करण्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. आपले मत अमूल्य असून, आपल्या मतांची किंमत हजार-पाचशे रुपये नसून, देशाची प्रगती घडवणारे आहे. भ्रष्ट नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हा सर्व भ्रष्टाचारी प्रकार वर्षोनुवर्षे देशातील जनता अनुभवत आहे.
सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षही तितकाच सक्षम असणे ही लोकशाहीची गरज आहे. लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे षड्यंत्र मतदारांनी खपवून घेऊ नये. सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने आतापर्यंत देशावर, राज्यावर लाखो, कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. ते कर्ज आपल्याच सर्वसामान्य जनतेला विविध कररूपाने फेडायचे आहे.
सुजाण मतदारांनी देशाचा विचार करता कोणत्याच हावरट आमिषाला बळी पडू नये. भ्रष्ट उमेदवारांना, नेत्यांना धडा शिकवण्याची ही चांगली संधी आहे. उमेदवाराकडे किती पैसा आहे हे पाहण्यापेक्षा तो किती लायक आहे, आपल्या मतदारसंघाचा किती विकास करू शकेल, अशा प्रामाणिक उमेदवारालाच निवडून देण्याची गरज आहे. उमेदवारांनी दिलेली लाच स्वीकारून क्षणाची मजा आपल्यासाठी आयुष्यभराची सजा ठरू शकते. मतदारांनी या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा. सक्षम, पारदर्शी लोकप्रतिनिधी ही काळाची गरज आहे.