महाशिवरात्रीची सुट्टी व्हॅलेंटाइन डेला; विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या दुखावल्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:30 AM2018-02-15T03:30:30+5:302018-02-15T03:30:38+5:30
महाशिवरात्रीच्या सुट्टीत ऐन वेळी बदल करून ती व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिल्याचा प्रकार नेरुळच्या डी.पी.एस. शाळा व्यवस्थापनाकडून घडला आहे. यामुळे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पालकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याकडून शाळा व्यवस्थापनाप्रति नाराजी व्यक्त होत आहे.
नवी मुंबई : महाशिवरात्रीच्या सुट्टीत ऐन वेळी बदल करून ती व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिल्याचा प्रकार नेरुळच्या डी.पी.एस. शाळा व्यवस्थापनाकडून घडला आहे. यामुळे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पालकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याकडून शाळा व्यवस्थापनाप्रति नाराजी व्यक्त होत आहे. तर केवळ महाशिवरात्रीऐवजी व्हॅलेंटाइन डेचे महत्त्व वाढवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून हा प्रकार केला गेल्याची टीका होत आहे.
मंगळवारी ठिकठिकाणी भक्तिभावनेने महाशिवरात्री साजरी होत असताना, नेरुळच्या डी.पी.एस. शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मात्र संभ्रमावस्थेत होते. काही महिने अगोदर त्यांना महाशिवरात्रीची सुट्टी ठरलेली असतानाही ऐन वेळी चार दिवस अगोदर त्यांच्या सुट्टीत बदल करण्यात आला. शाळा व्यवस्थापनाकडून मंगळवारऐवजी बुधवारी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी महाशिवरात्रीची सुट्टी घोषित केली. यामुळे मिळालेली सुट्टी नेमकी महाशिवरात्रीची की व्हॅलेंटाइन डेची, असा संभ्रम पालक व शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे. बोर्डानुसार प्रत्येक शाळांना सुट्ट्यांच्या नियोजनाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. असे असले तरीही विद्यार्थी व शिक्षक यांच्या धर्माचा आदर म्हणून त्यांच्या सणाच्या दिवशी सुट्टी मिळणे आवश्यक आहे. असे असतानाही हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व असलेल्या महाशिवरात्रीच्या सुट्टीपासून विद्यार्थी व शिक्षकांना वंचित ठेवण्याचे काम शाळा व्यवस्थापनाकडून झाल्याचा आरोप होत आहे.
सद्यस्थितीला बहुतांश कॉन्व्हेन्ट शाळांकडून विद्यार्थ्यांमध्ये पाश्चिमात्य संस्कृती रुजवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याकरिता भारतात महत्त्व असलेल्या सणांऐवजी पाश्चिमात्य संस्कृतीत महत्त्व असलेल्या दिवशी शाळांना सुट्टी दिली जाते. त्यामुळे महाशिवरात्रीऐवजी दुसºया दिवशी व्हॅलेंटाइन डेला सुट्टी देण्यामागेही तोच उद्देश असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे डी.पी.एस. शाळा व्यवस्थापनाकडून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. एकीकडे देशभरात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याला विरोध होत असताना, यंदा पहिल्यांदाच डी.पी.एस. शाळेकडून हा प्रकार घडलेला आहे; परंतु उघड तक्रार केल्यास शाळेकडून विद्यार्थ्यांना त्रास होईल या भीतीने पालकांनी दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाशिवरात्रीच्या सणाला पौराणिक महत्त्व असतानाही त्या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. मात्र, निराधार असलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सुट्टी देऊन विद्यार्थ्यांमध्ये नको असलेली संस्कृती बिंबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. मात्र, यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही.
सुट्ट्यांच्या बाबतीत बोर्डानुसार प्रत्येक शाळांना वेगळे नियम आहेत, तर डी.पी.एस. शाळेने महाशिवरात्रीची सुट्टी मंगळवारऐवजी बुधवारी दिल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल.
- संदीप संगवे,
शिक्षण अधिकारी,
न.मुं.म.पा.
कॉन्व्हेंट शाळांमधून भारतीय संस्कृतीचा ºहास करून हिंदू सणांचे महत्त्व कमी केले जात आहे. असाच प्रकार डी.पी.एस. शाळेकडून महाशिवरात्रीची सुट्टी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी देऊन झालेला आहे. या प्रकरणी शिक्षण मंडळाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली जाणार आहे.
- कृष्णा बांदेकर,
विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री.