नवी मुंबई : कोपरखैरणेतील माता बाल रुग्णालय मागील पाच वर्षांपासून बंद स्थितीमध्ये आहे. इमारतीच्या डागडुजीच्या नावाखाली हे रुग्णालय बंद केल्यानंतर अद्याप त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला व बालकांची गैरसोय होत असल्याच्या निषेधार्थ मनसेने महिला दिनाचे औचित्य साधून त्या ठिकाणी उपोषण केले.
पालिकेकडून आरोग्य सुविधा पुरवण्यावर पुरेसा भर दिला जात असला तरीही अनेक बाबींमध्ये प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरत असल्याचेही दिसून येत आहे. अशाच प्रकारातून कोपरखैरणे परिसरातील महिला व बालकांची पाच वर्षांपासून गैरसोय होत आहे. सेक्टर २२ येथील माता बाल रुग्णालयाच्या इमारतीच्या डागडुजीच्या कारणास्तव तिथले रुग्णालय बंद करण्यात आले. त्यास पाच वर्षांचा कालावधी उलटला तरीही अद्याप त्या ठिकाणी पुन्हा माता बाल रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना प्रसूतीसाठी अथवा बालकांच्या तपासणीसाठी ऐरोली अथवा वाशी रुग्णालयात जावे लागत आहे.
यामध्ये वेळ व पैसा दोन्ही खर्च होत असून दोन विभागांमध्ये अंतर फार असल्याने तातडीच्या प्रसंगी महिलांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. यावरून प्रशासनावर ताशेरे ओढत तातडीने तिथले माता बाल रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेतर्फे रविवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले.
मनसे विभाग अध्यक्ष विशाल ढोक, चंद्रकांत डांगे, घनश्याम चौधरी, समीर जाधव, अमित गावडे, तुषार कोंडाळकर, योगेश गोळे, सखाराम सकपाळ, संदीप गलुगडे, साईनाथ जाधव आदी उपस्थित होते. या वेळी माताबाल रुग्णालयाचा भूखंड मोक्याच्या ठिकाणी असल्याने तेथील रुग्णालय बंद करून भूखंड हडपला जाण्याचीही शक्यता मनसैनिकांनी व्यक्त केली.