महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:33 AM2023-07-08T07:33:28+5:302023-07-08T07:34:16+5:30
सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
-नामदेव मोरे
नवी मुंबई : महामुंबईकरांनी म्हणजेच मुंबई आणि परिसरातील भागातील नागरिकांनी यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत तब्बल १ लाख ३३ हजार टन आंबे फस्त केले आहेत. देशातील सात राज्यांमधून १५ प्रमुख प्रकारचे आंबे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला येतात. यामध्ये सर्वाधिक पसंती कोकणच्या हापूसला मिळते. यावर्षी सर्वाधिक ४४ हजार टन आवक मे महिन्यात झाली होती.
सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
मुंबई हीच आंब्याची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फेब्रुवारी ते जुलै, ऑगस्टपर्यंत बाजार समितीवर फळांच्या राजाचे वर्चस्व राहते. यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. एप्रिलपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत आवक जास्त झाली. मे व जूनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी झाली. गतवर्षी सहा महिन्यात १ लाख १४ हजार २७८ टन आंब्याची आवक झाली होती.
यावर्षी १ लाख ३३ हजार १०० टन आंब्याची आवक झाली आहे. येथून मुंबई, नवी मुंबईसह जगभर आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. संपूर्ण हंगामामध्ये ७ राज्यांमधून १५ प्रमुख प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत असतो. यामध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते ती कोकणच्या हापूस आंब्याला. दक्षिणेकडील राज्यातील हापूसशी साधर्म्य असलेला आंबा विक्रीसाठी येतो तोही अनेक विक्रेते कोकणच्या नावाने विकतात. हापूस व्यतिरिक्त पायरी, बदामी, केसर, जुन्नर हापूस, तोतापुरी, लालबाग, निलम, गोळा, मल्लिका, राजापुरी, लंगडा, दशेरी व चौसा हे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. सध्या उत्तरप्रदेशच्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. प्रतिदिन ८०० ते ९०० टन आवक होत आहे. ऑगस्टपर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होणार आहे.
प्रशासनाचे नियोजन
आंबा हंगामामध्ये प्रतिदिन ६०० वाहनांमधून आंबा विक्रीसाठी येतो समितीचे सचिव राजेश भुसारींच्या मार्गदर्शनाखाली उपसचिव संगीता अढांगळे यांनी यंत्रणा पूर्ण कार्यान्वित ठेवली.
मुंबई बाजार समितीमध्ये कोकणच्या हापूससह देशभरातून आंबा विक्रीसाठी येत असतो. सद्यस्थितीमध्ये उत्तर प्रदेशमधील लंगडा, दशेरी, चौसाचा हंगाम सुरू असून, ऑगस्टपर्यंत आंबे उपलब्ध होणार आहेत.
- संजय पानसरे, संचालक फळ मार्केट
कोणत्या राज्यातून कोणता आंबा येतो ?
महाराष्ट्र : हापूस, पायरी, केसर, जुन्नर हापूस
कर्नाटक, आंध्र, तामीळनाडू, केरळ: हापूस, पायरी, बदामी, केसर, तोतापुरी, लालबाग, निलम, गोळा, मल्लिका
गुजरात : हापूस, पायरी, केसर, राजापुरी.
उत्तरप्रदेश : लंगडा, दशेरी, चौसा