नवी मुंबई : मराठा आरक्षणाविषयीची भुमीका प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. सोमवारी घणसोलीमध्ये सभा होणार असून ती यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सभेच्या ठिकाणी ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची फळी तैनात केली जाणार असून पाण्यापासून पार्किंगपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये होणाऱ्या सभेचे नियोजन करण्यासाठी रविवारी घणसोलीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सकल मराठा समाजचे सर्व विभागांमधील समन्वयक व सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मराठा समाजामधील सर्व नागरिकांनी सभा यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
घणसोली सेक्टर ९ मधील धर्मवीर संभाजीराजे मैदानावर ही सभा होणार आहे. न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या बाजूला असलेल्या या मैदानावर होणाऱ्या सभेला हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी व्यासपिठापासून नागरिकांना व्यवस्थित विचार ऐकता यावेत यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी, वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व व्यवस्था पाहण्यासाठी स्वयंसेवकांची फळी तयार केली आहे. ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची नोंद झाली आहे.घणसोलीमध्ये रविवारी झालेल्या नियोजन बैठकीमध्ये दिलीप जगताप, विठ्ठल मोरे, अंकूश कदम यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक पदाधिकारी उपस्थित होते.
घणसोली कोपरखैरणेतून मोफत रिक्षाघणसोलीमध्ये सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. या सभेसाठी घणसोली रेल्वे स्टेशन व कोपरखैरणे गुलाबसन्स डेअरी येथून रिक्षाची मोफत सोय करण्यात आली आहे.अनेक रिक्षा चालकांनी स्वेच्छेने मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.