पालिका नगररचना विभागाची चूक अतिक्रमणला भोवणार !
By admin | Published: April 17, 2016 01:09 AM2016-04-17T01:09:05+5:302016-04-17T01:09:05+5:30
तुर्भेमध्ये निवासी चाळीमध्ये हॉटेल व लॉजिंगसाठी केलेल्या बांधकामाला नगरचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. अतिक्रमण झाले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
नवी मुंबई : तुर्भेमध्ये निवासी चाळीमध्ये हॉटेल व लॉजिंगसाठी केलेल्या बांधकामाला नगरचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. अतिक्रमण झाले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगररचना विभागाच्या चुकीमुळे अतिक्रमण विभागाचे काम वाढले असून, नागरिकांच्या विरोधामुळे येथील अतिक्रमण पाडावे लागणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून तुर्भे सेक्टर २० मध्ये रोडला लागून असलेली घरे एका हॉटेल व्यावसायिकाने विकत घेतली आहेत. सर्व घरे एकत्रित करून तेथे हॉटेल व लॉजिंग सुरू करण्यासाठी सिडकोकडून वापर बदलची परवानगी मिळविली आहे. या परवानगीनंतर महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली. पालिकेने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. हॉटेलचालकाने दोन्ही गल्लींच्या मधील मोकळ्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. पहिल्या माळ्यावर अनधिकृत बांधकाम झाले आहे. दुसरा मजला पूर्णपणे अनधिकृत आहे. हॉटेल व लॉजिंगमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही. असे असतानाही संबंधितांना बांधकामाची व बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिलेच कसे, असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे. नगररचना विभागाने नियम डावलून केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
नगरचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे. यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या हॉटेलमालकास नोटीस दिली आहे. दुसऱ्या मजल्यावर अतिक्रमण केले असून दोन्ही गल्ल्यांमधील सार्वजनिक वापराच्या जागेचाही अनधिकृतपणे वापर केला असून, सदर अतिक्रमण तत्काळ काढून टाकण्याची सूचना केली आहे. परंतु फक्त नोटीस देऊन काहीही उपयोग नाही. प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)