नवी मुंबई महापालिकेचा ४०२० कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:26 AM2019-03-08T00:26:04+5:302019-03-08T00:26:12+5:30
स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई : स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम तब्बल ५६३ कोटी रुपयांनी जास्त आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी १६ फेब्रुवारीला ३४५५ कोटी ६४ लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये दोन दिवस या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये १७३ कोटी रुपयांची वाढ केली होती. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी ३६२९ कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ५ मार्चला सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले. सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली. वास्तविक सर्व सदस्य अर्थसंकल्पावर चर्चा करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात चर्चा करण्यामध्ये बहुतांश सदस्यांना रस नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी फक्त दोन सदस्यांना त्यांचे मत मांडला आले होते. बुधवारी झालेल्या सभेमध्ये २० सदस्यांनी चर्चा केली होती. गुरुवारी शेवटच्या दिवशी फक्त ७ सदस्यांनी चर्चा केली. सभागृहामध्ये निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. यापैकी सर्वसाधारण सभेत २९ व स्थायी समितीमध्ये १३ जणांनी चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित सदस्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.
शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजता सभेचे आयोजन केले होते, परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित नसल्यामुळे तब्बल सव्वातास उशिराने सभा सुरू झाली. सभा सुरू असतानाही अनेक सदस्य वारंवार सभागृहाच्या बाहेर जात होते. सायंकाळी अर्थसंकल्प मंजूर करतानाही जवळपास ५१ जण सदस्य उपस्थित होते. शिवसेना व भाजपाचे सदस्य कमी प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांच्या अनुपस्थितीमध्ये चर्चेतील अल्प सहभाग यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामधील कामांविषयी सूचना केल्या. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की, अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांनी केलेल्या मौलिक सूचना आयुक्तांना सादर केल्या जातील. शहरातील विकासकामांची हीच गती कायम ठेवून नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सदस्यांनी चर्चा केली असून भविष्यात समुद्राचे पाणी शहरात येऊ नये यासाठी झडपा असलेले नाले बनविणे गरजेचे आहे त्यासाठी शहरात नाला व्हिजन राबविणे महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्प वास्तववादी असून कामांच्या गतीसाठी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभाग सक्षम करावा असे स्पष्ट केले.
>प्रशासनाची कसरत
आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजामध्ये तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पामध्ये केली आहे. वाढीव उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
>उत्पन्नासाठी सुचविलेली वाढ (खर्च कोटीमध्ये)
विभाग स्थायीचे महासभेची अंतिम
अंदाज वाढ उद्दिष्ट
रस्ते खोदाई शुल्क ३५ १० ४५
मालमत्ता कर ६८५ १३९ ८२४
नगररचना १९० १० २००
स्थानिक संस्था कर ११८६ २५ १२११
पाणीपुरवठा ९२ १५ १०७
बाह्य रुग्ण शुल्क २ २ ४
लोककला केंद्र अनुदान २३ ५ २८
मोरबे धरण १८ १० २८
>खर्चाची तरतूद
कामाचे नाव तरतूद
संगणकीकरण ९.९०
सीसीटीव्ही ७०
पाणी निचरा सुधारणा ७५
उड्डाणपूल बांधणे ७५
अडथळामुक्त रस्ते पदपथ ३७६
उद्याने २३.२५
शाळा वर्गखोली बांधणे ५६.७२
मंडई खुले गाळे बांधणे ३३.७६
नवीन जलवाहिन्यांची कामे २७.१०
नवीन जलकुंभ व उदंचन केंद्र २४.२९
दवाखाने बांधणे २७.१६
व्यायाामशाळा व विविध भवन ५५.२०
मैदाने विकसित करणे २३.६१
तलावांची सुधारणा १०.३६
गावठाण मलनि:सारण योजना २०.५९
नवीन पूल बांधणे ३३.३२
स्मशानभूमी बांधणे १५.१४
दिवाबत्ती सुधारणा १५.७५
विद्युतवाहक तारा भूमिगत १०.८१
परिवहन उपक्रम अनुदान १४०
कंत्राटी कामगार वेतन थकबाकी ७०