नामकरणाचा ठराव होऊनही अंमलबजावणी नाही
By admin | Published: May 4, 2016 12:11 AM2016-05-04T00:11:13+5:302016-05-04T00:11:13+5:30
आग्रोळी गावात महापालिकेच्या वतीने समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराला कै. लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित
नवी मुंबई : आग्रोळी गावात महापालिकेच्या वतीने समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराला कै. लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित केला होता. परंतु सात वर्षांचा काळ उलटला तरी त्याची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत.
आग्रोळी गावचे माजी पोलीस पाटील तसेच शिक्षणप्रेमी लक्ष्मण कृष्णा पाटील हे गावातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आग्रोळीतील ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना त्यांनी रुजवली व जोपासली. गावात गणपतीचे मंदिर उभारण्यासाठी स्वत:ची जागा दान केली. शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव गावातील समाज मंदिराला द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार माजी नगरसेवक अशोक भाऊ पाटील यांनी महासभेत हा ठराव मांडला होता. या ठरावाला २0 जुलै २00९ रोजीच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. तर तत्पूर्वी ८ आॅगस्ट २00९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतसुध्दा हा ठराव मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यानंतर २१ फेब्रुवारी २0१0 रोजी महापालिकेच्या वतीने नामकरण समारंभही घेण्यात आला होता. परंतु लक्ष्मण कृष्णा पाटील यांच्या नावाचे फलक मात्र लावले नाही. मंजूर झालेल्या ठरावानुसार समाजमंदिराला फलक लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. काँग्रेसचे बेलापूर विधानसभा क्षेत्र जनरल सेक्रेटरी सुधीर पाटील यांनी अलीकडेच महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेवून मंजूर झालेल्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी पाटील यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.