"14 वर्षांचा वनवास जवळपास संपला; साहेब, आता अयोध्येकडे कूच करावं लागेल!"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:36 PM2020-03-09T13:36:01+5:302020-03-09T17:23:40+5:30
आता रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
नवी मुंबईः 14 वर्षं पूर्ण करून आपण पुढे निघत आहोत. वनवास जवळपास संपल्यात जमा आहे. आता हा रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.
या पक्षाला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. 14 वर्षांचा प्रवास हा खाचखळग्यांनी भरलेला जरी असला तरी तो आपण स्वाभिमानानं पार केला आहे. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकानं धारदार कामगिरी करायला हवी, असं आवाहनच बाळा नांदगावकरांनी मनसैनिकांना केलं आहे. 23 जानेवारीला पहिलं महाराष्ट्रातलं आपलं अधिवेशन झालं. 23 जानेवारीला नवीन झेंडा महाराष्ट्राला अर्पण केला.
येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊ या. गेल्या 14 वर्षांत पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांने खूप मेहनत घेतली, ह्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच मनापासून अभिनंदन करतो. 23 जानेवारी 2020ला मुंबईत पक्षाचं जे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या नियोजनात आणि त्यानंतरच्या मोर्च्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो, असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. त्या अधिवेशनानंतर आजतागायत चांगलं वातावरण निर्माण होत आहे. 9 फेब्रुवारीला जो मोर्चा काढला आहे, तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मनसेसाठी चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आता आपला प्रवास वेगळ्या दिशेनं सुरू आहे.
या मेळाव्यास राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक आलेले आहेत. या वेळी राज ठाकरे यांच्याकडून पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर केली गेली आहे. त्यामध्ये 30 ते 40 जणांचा समावेश आहे. मनसेची ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहणार आहे. त्या माध्यमातून सरकारला पावलोपावली कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यापुढे मनसेचा राहणार असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या मेळाव्यामुळे नवी मुंबईच्या मनसैनिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यापैकी अनेक जण पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. शॅडो कॅबिनेटमधल्या गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन या विभागांवर बाळा नांदगावकर लक्ष ठेवणार आहेत.