NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राजकीय नेत्यांमधील संघर्षाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटत असतात. नेत्यांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही आक्रमक होतात आणि कधीकधी तर पातळी सोडून आक्षेपार्ह भाषेचाही वापर करू लागतात. अशी आक्षेपार्ह भाषा वापरणं मुंबईतील एका उच्चशिक्षित तरुणाला महागात पडलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विशाल गोर्डे या ३३ वर्षीय तरुणाला बेलापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. "आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे याच्याविरूद्ध आज तक्रार दाखल केली. लवकरात लवकर याला अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली, नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल," असा इशारा घाणेकर यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या विशाल गोर्डे या एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. गोर्डे याला वाशी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी विशाल गोर्डेने जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.
कोरोनात नोकरी गेली, बेरोजगार विशालने काय दावा केला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं विशाल गोर्डेने सांगितलं आहे. तसंच "मी रबाळे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होतो. मात्र कोरोना महामारीच्या काळात २०२१ मध्ये माझी नोकरी गेली. त्यानंतर मी कंपन्यांना कामगार पुरवण्याचं काम कर होतो. मात्र त्यातून फारसे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे मी नैराश्यात गेलो," असा दावा विशालने केला आहे.