नवी मुंबई : गुंतवणुकीच्या माध्यमातून नफ्याचे आमिष दाखवून एक कोटीची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी गोव्याच्या दाम्पत्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सीबीडी बेलापूर येथे राहणाऱ्या रश्मी चावला यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. त्यांचे पती सुभाष चावला हे खासगी जहाजावर कॅप्टन आहेत. त्यांची गोव्याच्या लेव्हिनो डायस याच्यासोबत ओळख झाली. डायस याने आपली पत्नी कार्ल लॉजिस्टीक फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभाचीही हमी दिली. त्यानुसार चावला यांनी गुंतवणुकीसाठी एक कोटी रुपये दिले. त्या बदल्यात प्रतिमहा ७ लाख २० हजार रुपये नफ्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पहिल्याच महिन्यात डायसने दिलेला धनादेश न वटल्याने चावला यांना संशय आला होता. यामुळे त्यांनी गोवा येथे जाऊन त्याची भेट घेतली असता, आर्थिक मंदीचे कारण त्यांना देण्यात आले.
यानंतर त्याने दुसºया कंपनीत पैसे गुंतवून नफा मिळवून देतो, असे सांगितले. या दरम्यान वर्षभरात दिलेले धनादेशही वटले नाहीत. यानंतर डायस यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने चावला यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.